११ दिवसांचीच मुदतवाढ !
By admin | Published: July 23, 2015 01:22 AM2015-07-23T01:22:41+5:302015-07-23T01:22:41+5:30
राज्य भाषा सल्लागार समितीची मुदत १२ एप्रिलला संपल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी या समितीला मुदतवाढ देण्याची
पुणे : राज्य भाषा सल्लागार समितीची मुदत १२ एप्रिलला संपल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी या समितीला मुदतवाढ देण्याची जाग भाषा संचालनालयाला आली आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे, हा मुदतवाढ फक्त ११ दिवसांचीच आहे. त्यातही अध्यादेश काढून हा निर्णय शासनाने जाहीर केला असला, तरी तो अद्याप समितीला मिळालेला नाही.
राज्याचे पुढील २५ वर्षांचे मराठी भाषा धोरण ठरविण्याबरोबरच भाषेच्या अभिवृद्धीसाठी कार्यरत असलेल्या या समितीला मसुद्यात बदल करून तो अंतिम करण्यासाठी २० जुलैला परिपत्रक काढून ३१ जुलैपर्यंतच मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, मसुद्याचे काम केवळ २० टक्केच झाले असून, या कामाला तीन महिने लागणार असल्याचे समितीने शासनाला कळविले आहे. त्यामुळे समितीला अजून काही महिने तरी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
इतक्या कमी कालावधीत मसुद्याचे काम पूर्ण होणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण देत यासंदर्भात शासनाला पत्र पाठविण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)