अकरावी सीईटीसाठी ११ लाख अर्ज, प्रवेशास प्राधान्य देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:10 AM2021-08-01T04:10:51+5:302021-08-01T04:10:51+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यातील नऊ विभागीय ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यातील नऊ विभागीय मंडळांतर्गत एकूण १५ लाख ७५ हजार ८०६ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावी प्रवेशासाठी सीईटी बंधनकारक नसली तरी सीईटी देणा-या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी दहावीचे नियमित विद्यार्थी व पुनर्परीक्षार्थी या दोन्ही विद्यार्थ्यांना सीईटी द्यावी लागणार आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे १६ लाख विद्यार्थी सीईटी परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत. त्यातील १० लाख ८० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी शनिवारी साडेचार वाजेपर्यंत सीईटीसाठी अर्ज केला होता. विद्यार्थ्यांना येत्या २ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यामुळे सीईटीसाठी अर्ज करणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
---------------------------
काही विद्यार्थ्यांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी योग्य तो एकच अर्ज ठेऊन जादाचा अर्ज डिलीट करावा. येत्या १ ऑगस्टपासून ही सुविधा उपलब्ध असेल. मात्र, विद्यार्थ्यांनी एक अर्ज संगणकीय प्रणालीमध्ये असल्याची खातरजमा करावी. तसेच विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी या संदर्भातील अन्य शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
----------------------------
अर्जात दुरूस्तीची संधी
अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जात दुरूस्ती करण्याची संधी देण्यात आली असून विद्यार्थी ई-मेल आयडी, परीक्षेचे माध्यम, निवासाचा पत्ता व त्यानुसार परीक्षा देण्यासाठी निवडलेला जिल्हा /तालुका / शहराचा भाग निवडू शकतात. ईडब्ल्युएस प्रवर्ग आदी माहितीत विद्यार्थी बदल करू शकतात. अर्जातील इतर माहिती शाळेकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे मंडळाने अर्जात घेतली आहे. त्यामुळे उर्वरित माहितीमध्ये बदल करण्यासाठी शाळेशी संपर्क साधावा,असे आवाहन राज्य मंडळातर्फे करण्यात आले आहे.
-----------------------------