महाडीबीटीवर राज्यातून ११ लाख अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:10 AM2021-03-18T04:10:04+5:302021-03-18T04:10:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शेतीसाठीच्या विविध योजना एकाच अर्जात यासाठी राज्य सरकारने राबवलेल्या महाडीबीटी पोर्टलवर राज्यातून तब्बल ११ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शेतीसाठीच्या विविध योजना एकाच अर्जात यासाठी राज्य सरकारने राबवलेल्या महाडीबीटी पोर्टलवर राज्यातून तब्बल ११ लाख अर्ज मिळाले आहेत. त्यांची सोडत काढण्यास सुरूवात झाली आहे. केंद्र व राज्य सरकार यांनी ६० व ४० टक्के प्रमाणात या योजनांसाठी म्हणून तब्बल ८०० कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या आर्थिक वर्षात केली असून मार्च २०२१ अखेर ती खर्च होईल.
अर्जदारांची संख्या लक्षात घेऊन योजनेसाठी सोडत काढण्यात येत आहे. शेतीची यांत्रिक अवजारे, फळबाग लागवड, शेतीसाठी ठिबक सिंचन व अनुसूचित जाती-जमाती गट अशा ४ प्रकारात अनुदान देण्यात येते. पूर्ण खर्च किंवा ८० टक्केपर्यंतचा खर्च सरकारकडून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठीही पोर्टलचा वापर करून घेण्यात येत आहे.
अर्ज ऑनलाईन करायचा असूनही शेतकऱ्यांनी यात रस दाखवला आहे. कोणत्याही एका किंवा एकापेक्षा जास्त योजनांसाठीही एकच अर्ज करायचा. त्यात मोबाईल क्रमांक, बँक खाते अशी माहिती द्यायची. सोडतीत तो निवडला गेला की मोबाईलवर संदेश, मग आवश्यक कागदपत्रे पोर्टलवरच अपलोड करायची, छाननी झाली की मोबाईलवरच पूर्वसंमती मिळेल. मग स्वखर्चाने ती खरेदी करायची, त्याच्या पावत्या पोर्टलवर अपलोड करायच्या. त्यानंतर अनुदान थेट बँक खात्यात जमा होणार आहे. ट्रॅक्टर, ट्रॉली, नांगर, शेततळे, फळबाग, सिंचनमध्ये स्पिंकलर, ठिबक, अशा अनेक गोष्टीसाठी अनुदान आहे.