विदेशातील नोकरीच्या आमिषाने ११लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:45 PM2018-03-13T12:45:20+5:302018-03-13T12:45:20+5:30
१० तरुणांना फसविले : आॅफिस बंद करून झाले फरार.
पुणे : अमेरिका, न्यूझीलंड, कॅनडा या देशात हॉटेलमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून पैसे घेऊन दोघे जण आॅफिस बंद करून फरार झाले आहेत़. याप्रकरणात १० तरुणांची तब्बल ११ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाली असून, शिवाजीनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. याप्रकरणी योगेश जाधव (वय ३१, रा़ कोथरूड) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़.ही घटना जुलै २०१७ ते मार्च २०१८ दरम्यान शिवाजीनगर येथील ठुबे पार्क येथे घडली़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, पांडे व एका महिलेने परदेशातील हॉटेल, मॉलमध्ये काम करून महिन्याला २ ते ४ लाख रुपये कमवा, अशी जाहिरात दिली होती़. त्यावरून अनेक तरुणांनी त्यांच्या ठुबे पार्क येथील कार्यालयात संपर्क साधला़. तेथे या दोघांनी त्यांना अमेरिका, न्यूझीलंड, कॅनडा या देशातील हॉटेल, मॉलमध्ये महिना अडीच लाख रुपयांची नोकरी मिळवून देतो, असे सांगून त्यासाठी प्रत्येकाकडून परदेशात जाण्यासाठी १ लाख १० हजार रुपये घेतले़. त्यातील काही पैसे रोख, तर काही पैसे धनादेशाद्वारे घेण्यात आले़ .जुलै २०१७ पासून त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून या तरुणांना झुलवत ठेवले़. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ते ठुबे पार्क येथील आॅफिस बंद करून फरार झाले़ त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.