Pune Crime: पुणे शहरात वेगवेगळ्या चार घटनांमध्ये ११ लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 09:47 AM2023-07-07T09:47:09+5:302023-07-07T09:47:55+5:30
वेगवेगळ्या चार घटनांमध्ये रोख रकमेसह सुमारे ११ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
पुणे : दिवसेंदिवस शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. एकीकडे पोलिस रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवत असताना, दुसरीकडे चोर त्यांचे काम जोरात करत आहेत. वेगवेगळ्या चार घटनांमध्ये रोख रकमेसह सुमारे ११ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पहिल्या घटनेत, सहयोगनगर, वारजे माळवाडी येथे राहणारे रामचंद्र मारुती कटरे (३६) यांचे घर बंद असताना चोराने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून रोख १ लाख ३९ हजार ९०० रुपये, ३४ ग्रॅम वजनाचे ९३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, १२० ग्रॅम वजनाचे ७ हजार रुपयांचे चांदीचे दागिने असा २ लाख ३९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटनेत लोणीकंद येथील लक्ष्मी निवृत्ती र्केद (६४, रा. दत्तनगर) यांच्या घराचे लॉक तोडून चोराने वरच्या मजल्यावरील धान्याच्या कोठीत ठेवलेले ३ लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. तिसऱ्या घटनेत लोणीकंद यथील कुमार पाटीलबुवा आव्हाळे (३७, रा. आव्हाळवाडी) यांच्या दुकानाच्या छतावरील पत्रे उचकटून चोरांनी दुकानाच्या काउंटरमधील ५ लाख रोख तसेच ५० हजार रुपयांचे दोन डीव्हीआर चोरून नेले. या दोन्ही घटनांची लोणीकंद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
चौथ्या घटनेत धानोरी येथील स्मिता बजरंग राणे (४०, रा. बॉर्डर रोड सोसायटी) यांच्या घराचे लॉक तोडून चोराने कपाटातील ४५ हजार रुपयांचे दीड तोळ्याचे सोन्याचे नेकलेस चोरून नेले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिस तपास करत आहेत.