जम्मू-काश्मीर ट्रिपच्या नावे तिघांची ११ लाखांची फसवणूक, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Published: June 17, 2024 02:57 PM2024-06-17T14:57:44+5:302024-06-17T14:58:43+5:30
पुणे : जम्मू काश्मिर येथे फॅमिली टूरला जाण्यासाठी तिघांनी एका टुर्स अँड ट्रॅव्हल एजन्सीला ११ लाख रुपये दिले. मात्र ...
पुणे : जम्मू काश्मिर येथे फॅमिली टूरला जाण्यासाठी तिघांनी एका टुर्स अँड ट्रॅव्हल एजन्सीला ११ लाख रुपये दिले. मात्र संबंधित टूर कंपनीने पैसे घेऊन कोणतीही ट्रिप आयोजित न केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रविंद्र बाबाजी शेंडकर (पॅराडाईज हॉलीडे टुर्स, भक्ती प्लाझा, ब्रेमेन चौक, औंध) याच्यावर अभिषेक माणिकराव ननावरे (३७, गुलटेकडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ननावरे यांच्याकडून आरोपीने ७० हजार, राधेय संतोष दगडे यांच्याकडून २ लाख ४० हजार आणि संतोष अरूण राऊत यांच्याकडून ७ लाख ९० हजार ७९७ रुपये घेतले. हा प्रकार १३ फेब्रुवारी ते १६ जून या कालावधीत घडला. मात्र, जम्मू काश्मिरला जाण्यासाठी ठरल्याप्रमाणे सुविधा न देता, ट्रीप आयोजित न करता विश्वासघात करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय फिर्यादींनी शेंडकर याला पैशांची मागणी केली असता, त्याने धमकावल्याचे देखील फिर्यादींनी सांगितले. याप्रकरणाचापुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक झरेकर करत आहेत.