अंगारे, धुपाऱ्यापासून मुक्ती; आदिवासी पाड्यातल्या ११ वर्षांच्या स्नेहलला मिळाली दृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 09:36 AM2022-05-24T09:36:45+5:302022-05-24T09:40:11+5:30
११ वर्षाच्या स्नेहलला मिळाली नवदृष्टी...
-ज्ञानेश्वर भाेंडे
पुणे : स्नेहलच्या दाेन्ही डाेळ्यांना जन्मजात माेतीबिंदू झालेला. शाळेत नियमित आराेग्य तपासणीदरम्यान डाॅक्टरांनी त्याचे निदान केले व शस्त्रक्रिया करण्याचा सल्लाही पालकांना दिला. मात्र, आदिवासी पाड्यात राहणाऱ्या स्नेहलच्या पालकांनी अज्ञानामुळे दुर्लक्ष करीत अंगारे-धुपारे केले. शेवटी डाॅक्टर व शिक्षकांनीच पुढाकार घेऊन याेजनेतून तिची शस्त्रक्रिया करवून घेतली असून, तिला नवदृष्टी मिळाली आहे.
स्नेहल शिवराम वर्ये (वय ११, रा. निर्मळवाडी, ता. खेड) ही निर्मळवाडी जिल्हा प्राथमिक शाळेत सहावीत शिकते. पाच वर्षांपूर्वीच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) पथकातील डाॅ. अशाेक बारगजे यांनी शाळेत नियमित तपासणी दरम्यान स्नेहलला माेतीबिंदू असल्याचे सांगितले. तिच्या आजीला आरबीएसकेच्या याेजनेद्वारे शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी औंध जिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितले.
डाॅक्टरांचे पथक शाळेत नियमित तपासणी करण्यासाठी गेले असता त्यांना स्नेहलची पाच वर्षांनंतरही शस्त्रक्रिया न झाल्याचेे आढळून आले. आजीने तिला देवीची बाधा झाल्याचे व विविध दवाखान्यांत घेऊन गेल्याचे सांगितले. पण, पथकाने त्यांना जिल्हा रुग्णालयात जाण्याचा पुन्हा सल्ला दिला. यानंतर अखेर स्नेहलच्या शिक्षिका वनमाला काेंगे यांनीच तिला घेऊन औंध जिल्हा रुग्णालयातील ‘डीईआयसी सेंटर’च्या सल्ल्यानुसार हडपसरमधील खासगी रुग्णालयात घेऊन गेल्या. तेथे तिच्या एका डाेळ्याची ११ मे आणि दुसऱ्या डाेळ्याची १७ मे राेजी शस्त्रक्रिया झाली व तिला अखेर नवी दृष्टी मिळाली. यासाठी आरबीएसकेच्या पथकातील डाॅ. मृणाल कांबळे, औषध निर्माण अधिकारी सुजित पिंगळे, परिचारिका कानुबाई लटपटे यांनी विशेष प्रयत्न केले.
अंगणवाडी व शाळेतील शून्य ते १८ वर्षे वयाेगटातील बालकांची नियमित आराेग्य तपासणी करून गरज पडल्यास त्यांना शासकीय फंडातून उपचार, शस्त्रक्रिया देणारा हा ‘आरबीएसके’ उपक्रम आहे. याअंतर्गत पुणे शहर व जिल्ह्यात ७४ पथके कार्यरत असून त्यांच्याकडून आतापर्यंत ह्रदय शस्त्रक्रिया, डाेळ्यांच्या शस्त्रक्रिया व इतर मिळून हजाराे शस्त्रक्रिया केल्या आहेत.
माेतीबिंदू झाल्याने स्नेहलला लिहायला व वाचायला त्रास हाेत हाेता. अक्षरांना ती वरच्या बाजूने रेष देण्याऐवजी अक्षरांच्या मध्येच रेषा द्यायची. पालक अशिक्षित असल्याने ते पाठपुरवा करू शकत नव्हते. मग आम्हीच आमच्या वाहनाने नेऊन शासकीय याेजनेतून तिची शस्त्रक्रिया करवून घेतली. यासाठी मुख्याध्यापक साेमा गावडे व स्नेहलची वर्गशिक्षिका निर्मला खेडकर यांचे सहकार्य लाभले.
- वनमाला काेंगे, शिक्षिका, निर्मळवाडी प्राथमिक शाळा
स्नेहलला जन्मजात माेतीबिंदू हाेता. त्यामुळे तिला धुरकट दिसत हाेते. लिहिताना व वाचताना ती डाेळे बारीक करून पाहत असे. जर लवकर शस्त्रक्रिया केली नाही तर पुढे काचबिंदूत रूपांतर हाेऊन दृष्टी पूर्णपणे जाण्याचा धाेका असताे. गर्भधारणेदरम्यान मातेने याेग्य आहार किंवा पथ्य न पाळल्यास हा आजार हाेताे. अशा मुलांची शस्त्रक्रिया आरबीएसके या कार्यक्रमातून माेफत हाेते.
- डाॅ. अशाेक बारगजे, वैद्यकीय अधिकारी, आरबीएसके, खेड