लष्करी वैद्यकीय सेवेत ११० पदवीधर झाले दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:10 AM2021-05-16T04:10:36+5:302021-05-16T04:10:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना नियमावलीचे पालन करत लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात ५५ व्या सी तुकडीच्या २१ महिला कॅडेटसह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना नियमावलीचे पालन करत लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात ५५ व्या सी तुकडीच्या २१ महिला कॅडेटसह ११० कॅडेट्सनी लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण करून लष्करी वैद्यकीय सेवेत दाखल झाले. येथील परेड ग्राऊंडवर पार पडलेल्या या सोहळ्याचे प्रमुख म्हणून एएफएमसीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल नरदीप नैथानी यांनी मानवंदना स्विकारली.
लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परेड ग्राऊंडवर दरवर्षी मोठ्या दिमाखात दीक्षांत संचलन सोहळा पार पडत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला. मात्र, महाविद्यालयाच्या आवरातच शनिवारी झालेल्या कार्यक्रमात या विद्यार्थ्यांना लष्करी वैद्यकीय सेवेत रूजू करून घेण्यात आले. लष्करातील ९४ कॅडेट्स, भारतीय हवाई दलात १० कॅडेट्स तर भारतीय नौदलात ६ कॅडेट्सना नियुक्त करण्यात आले. नव्याने नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना एएफएमसीचे प्रशिक्षक
कर्नल ए. के. शाक्य यांनी भारतीय संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली. या वर्षी सी ३ या तुकडीने उल्लेखनीय यश मिळवले. २०१६ मध्ये प्रवेश घेतलेल्या या तुकडीतील सर्वच सर्व विद्यार्थ्यांनी पदवी मिळवून 100 टक्के यशाची नोंद केली.
लेफ्टनंट जनरल नरदीप नैथानी म्हणाले, देश अतिशय खडतर कालखंडातून सध्या वाटचाल करत आहे. कोरोना विषाणू विरोधात देशाचा लढा सुरू आहे. यामुळे लष्करी वैद्यकीय सेवेत दाखल होणारे हे विद्यार्थी कोविड योद्धे म्हणून सेवेत दाखल होत आहे. एएफएमसीमध्ये मिळालेले ज्ञान आणि कौशल्य यांचा वापर रुग्णांना सर्वोत्तम उपचार पुरवण्यासाठी करावा, असे आवाहन नैथानी यांनी केले.
यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना ट्रॉफी, पदके आणि पारितोषिके प्रदान करण्यात आले.
चौकट
सर्वोत्तम अष्टपैलू कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपतींच्या सुवर्णपदकाची त्याच बरोबर कलिंगा ट्रॉफीची व आणि डीजीएएफएमएस सुवर्ण पदकाची मानकरी विनीता रेड्डी ही विद्यार्थीनी ठरली. कॉलेज कॅडेट कॅप्टन राहिलेल्या सुयश सिंग या वैद्यकीय कॅडेटला दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल मेजर जनरल एनडीपी करणी ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. एमबीबीएस परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवल्याबद्दल निकिता दत्ता या कॅडेटला लेफ्टनंट जनरल थापर सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
चौकट
या विद्यार्थ्यांच्या कमिशनिंगसाठी तयारीचा कालावधी पूर्वी चार ते पाच आठवडे होता. तो आता केवळ दोन आठवडे करण्यात आला आहे. या दोन आठवड्यांत या विद्यार्थ्यांना कोविड केअर केंद्रांमध्ये काम करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी अमेरिकन हार्ट असोसिएशनचे बेसिक लाईफ सपोर्ट आणि एसीएलएस (ऍडवान्स्ड कार्डियाक लाईफ सपोर्ट) प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील पूर्ण केले आहेत. कमिशन देण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी देशभरातील सशस्त्र सेवा दलांच्या ३१ रुग्णालयांमध्ये इंटर्न म्हणून काम करण्यासाठी तात्काळ रवाना होणार आहेत.
फोटो ओळ : लष्करी वैद्यकीय सेवेबाबत शपथ घेताना नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी.