पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांचं 'स्पेशल ऑपरेशन', भंगाराच्या दुकानात सापडली ११०० काडतुसे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 11:34 PM2022-06-12T23:34:17+5:302022-06-12T23:35:12+5:30
भंगारमाल व्यावसायिकाच्या दुकानातून अकराशे काडतूसे जप्त. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई!
शिवानी खोरगडे
पुण्यात भंगाराच्या दुकानात तब्बल अकराशे काडतुसे सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूनला पुणे दौऱ्यावर असणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी छापे आणि तपासणी सुरू केलेली आहे. दरम्यान, गुरुवार पेठेतील गौरी आळी या परिसरात एका भंगार मालाच्या दुकानात चक्क काही जिवंत तर काही खराब काडतुसे तसंच बुलेट म्हणजेच लीड पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
पुणे पोलिसांकडून सध्या शहरात ऑपरेशन ऑल आऊट राबवण्यात येत आहे. गौरी आळी इथं भंगार मालाचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाच्या दुकानात काडतुसे असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. यावेळी पोलीस ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत पेट्रोलिंग करत होते. तेव्हाच त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून त्यांना काडतुसांबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. तसंच पोलिसांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर बातमी खरी असल्याचं कळताच पोलिसांनी दुकानावर छापा टाकला.
दिनेश कुमार सरोज असं या भंगारमालाच्या व्यावसायिकाचं नाव आहे. यानंतर पोलिसांनी दिनेश कुमार याला ताब्यात घेतलं असून आरोपीने एवढी काडतुसे आणि बुलेट कुठून आल्यात? ते का जवळ बाळगले होते? दिनेशकुमारने यातली काही काडतुसे कोणाला दिली होती का? याचा तपास करत आहेत. पोलिसांनी संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्याला १५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
१४ जूनला देहू संस्थानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा नियोजित आहे. मात्र दुसरीकडे रविवारी भवानी पेठ इथं एका इमारतीत संशयास्पद स्फोट झाला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. तर दुसरीकडे ही काडतूसे सापडल्याचं पुढे येतंय. या घटनांनंतर पोलिसांकडून अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे.