अबब!पुण्यात विना हेल्मेटच्या १७ लाख ५ हजार ९१५ कारवाया; पुणेकरांना एकूण १११ कोटी रुपये दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 06:13 PM2020-01-14T18:13:46+5:302020-01-14T18:44:02+5:30
पोलिसांनी २०१९ मध्ये प्राणघातक अपघाताची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचा केला निर्धार..
पुणे : शहरातील वाहतूक नियोजनाऐवजी वाहतूक पोलिसांचा दंड करण्यावर भर असतो, अशी टिका केली जाते. वाहतूक पोलिसांना टारगेट ठरवून दिले जाते, असे सांगित जाते. याचा प्रत्यय वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईत दिसून आला आहे. गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांनी तब्बल २७ लाख ५९ हजार २२९ वाहनांवर कारवाई केली असून त्यांच्यावर तब्बल १११ कोटी ७४ लाख ३३ हजार ५० रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे.
गतवर्षी ५२ कोटी रुपयांचा दंड करण्यात आला होता. त्याच्या दुप्पटीहून अधिक दंड यंदा करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी २०१९ मध्ये प्राणघातक अपघाताची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी अन्य कोणत्याही सोयीसुविधांचा विचार न करता हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. त्यातून शहरात मोठ्या प्रमाणावर निषेधही करण्यात आला होता.पण, त्याकडे दुर्लक्ष करुन पोलिसांनी हेल्मेटसक्ती कडकपणे राबविण्यास सुरुवात केली़ चौकाचौकात पोलीस एखाद्या टोळीप्रमाणे उभे राहून विना हेल्मेटधारक वाहनचालकाला अक्षरश वाहत्या रस्त्यावरुन पकडून आणत असत. त्यातूनच लोकप्रतिनिधींनी त्याच्या तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या. त्यानंतर चौका चौकात उभे राहणारे हे वाहतूक पोलीस गायब झाले. त्याऐवजी सीसीटीव्हीमार्फत कारवाया केल्या जाऊ लागल्या. वाहतूक शाखेचे २४ विभाग आणि सीसीटीव्ही द्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. २०१९ च्या वर्षभरात तब्बल १७ लाख ५ हजार ९१५ विना हेल्मेटच्या प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. त्यातील बहुतांश दंड हा वसुल होऊ शकलेला नाही. ज्या प्रमाणात हा दंड करण्यात आला आहे़ ते पाहता त्याप्रमाणात पुणे शहरातील हेल्मेट घालणाऱ्यांची संख्या वाढलेली नाही. तसेच वाहतूकीतही सुधारणा झालेली नाही. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये प्राणांतिक अपघातांमध्ये १७.०८ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, हे प्राणांतिक अपघात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नाही तर वाहतूक कोंडीत झालेली वाढ, मेट्रोची सुरु असलेली कामे व त्यामुळे वाहतूकीचा वेग मंदावल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे़.
.........
वाहतूक पोलिसांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ केलेली दंडात्मक कारवाई
नियमभंग केसेस
नो पार्किंग ३२३०७४
विना लायसन्स २०७१९
मोबाईल टॉकिंग १९२९९
झेब्रा क्रॉसिंग ५९९३१
विना हेल्मेट १७०५९१५
नो एन्ट्री ३५१०६
रॅश ड्रायव्हिंग १२०२६
ट्रिपलसिट १६८००
लायसन्स जवळ न बाळगणे ११९७८९
रॉग साईड ड्रायव्हिंग
इतर ३९८७०८
़़़़़़़़़़़
एकूण २७५९२२९