धरणात ११.१० टीएमसी पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:10 AM2021-05-10T04:10:29+5:302021-05-10T04:10:29+5:30
पुणे : पुणे महापालिकेला पिण्यासाठी व ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात सध्या ११.१० टीएमसी एवढा पाणीसाठा ...
पुणे : पुणे महापालिकेला पिण्यासाठी व ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात सध्या ११.१० टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षापेक्षा यंदा १ टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. तसेच सुमारे तीन महिन्यांपासून धरणातून शेतीसाठी सोडण्यात आलेला विसर्ग अजूनही सुरूच आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असल्यामुळे यंदा पाणीकपात करण्याची वेळ येणार नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
खडकवासला धरण प्रकल्पातील वरसगाव, पानशेत, टेमघर व खडकवासला या चार धरणांमधून पुणे महानगरपालिका व परिसरातील गावांना, तसेच ग्रामीण भागाला शेतीसाठी आवश्यक पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे पुण्यासह राज्यातील बहुतांश धरणे शंभर टक्के भरली. त्यामुळेच २८ फेब्रुवारीपासून धरणातून शेतीसाठी सोडलेला विसर्ग अद्याप बंद केलेला नाही. मागील वर्षी ९ मे रोजी खडकवासला धरण प्रकल्पात १०.१३ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. यावर्षी धरणात ११.१० टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.
हवामान विभागाने वर्तवला अंदाजानुसार यावर्षी मान्सून वेळेत बरसणार आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. शनिवारी वरसगाव धरण परिसरात १९ मि.मी., पानशेत धरण क्षेत्रात २० मि.मी., खडकवासला परिसरात १६ मि.मी. पाऊस पडला. याच पद्धतीने वरुण राजाची कृपादृष्टी राहिली तर पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट येणार नाही.
धरणात सध्या ११.१० टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच, येत्या मेअखेरपर्यंत शेतीसाठी सोडलेले आवर्तन सुरूच ठेवले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सुमारे अडीच ते तीन टीएमसी पाणी शेतीसाठी वापरले तरी पिण्यासाठी ६ ते ७ टीएमसी पाणी शिल्लक राहते. त्याचप्रमाणे मान्सून जूनऐवजी जुलै महिन्यात बरसला, तरीही धरणात पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहणार असल्याचे दिसून येते आहे.
--
खडकवासला धरणातील उपलब्ध पाणीसाठा
वरसगाव : ५.०२ टीएमसी
पानशेत : ५.१९ टीएमसी
खडकवासला :०.४८ टीएमसी
टेमघर :०.४२ टीएमसी