जेजुरी देवसंस्थानची पश्चिम महाराष्ट्रात ११३ एकर जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:14 AM2021-09-12T04:14:37+5:302021-09-12T04:14:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जेजुरी : मराठेकालीन व पेशवेकालीन राजे-महाराजे, सरदार-इनामदार घराण्यांनी देवाच्या नावाने इनाम, सनद म्हणून ...

113 acres of land of Jejuri Dev Sansthan in Western Maharashtra | जेजुरी देवसंस्थानची पश्चिम महाराष्ट्रात ११३ एकर जमीन

जेजुरी देवसंस्थानची पश्चिम महाराष्ट्रात ११३ एकर जमीन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जेजुरी : मराठेकालीन व पेशवेकालीन राजे-महाराजे, सरदार-इनामदार घराण्यांनी देवाच्या नावाने इनाम, सनद म्हणून ज्या जमिनी देवसंस्थाने, मंदिरांचे व्यवस्थापन, दिवाबत्ती, पूजा, नैवेद्य आणि धार्मिक विधी उत्सवांसाठी ज्या मानकरी व सेवेकरी यांना दिल्या होत्या, त्या जमिनी देवसंस्थानच्या मालकीच्या असून, वहिवाटदारांचा काहीएक हक्क सांगता येणार नाही. तसेच वहिवाटदारांना परस्पर विक्री करता येणार नाही. देवालये, देवस्थाने किंवा देवसंस्थानची सेवा करत नसलेल्या वहिवाटदारांकडून ही जमीन काढून घेतली जाईल, असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्याने राज्यातील अनेक तीर्थक्षेत्रे असलेल्या देवसंस्थान समित्यांना दिलासा मिळाला आहे. जेजुरी देवस्थानची तब्बल ११३ एकर जमीन पश्चिम महाराष्ट्रात आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे सर्वात मोठा दिलासा श्री मार्तंड देवसंस्थान समितीला मिळाला आहे. शोध लागलेल्या जमिनींमधून मोठे उत्पन्न देव संस्थानच्या तिजोरीत जमा होऊ शकते, त्यासाठी सद्यस्थितीत कसत असलेल्या वहिवाटदारांनी देव संस्थानकडे संपर्क साधणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाच्या नावे पश्चिम महाराष्ट्रातील काही गावांमध्ये जमिनी असल्याची माहिती उपलब्ध कागदपत्रांवरून देवसंस्थान समितीने मिळवली आहे. याबाबत माहिती देताना देवसंस्थान विश्वस्त शिवराज झगडे म्हणाले, खंडोबा देव, मार्तंड देव, मल्हारी देव, खंडेराव देव या नावे सुमारे ११ ३एकर जमीन देवसंस्थानची आहे. विशेष बाब म्हणजे खंडेरायाच्या नावे असलेल्या सर्व जमिनी बागायती क्षेत्रातील आहेत. यापैकी सणसर, सांगवी आणि पिसर्वे येथील जमिनी वगळता कोणतेही कागदपत्र अथवा माहिती देवसंस्थानकडे उपलब्ध नव्हती. परंतु, माहिती अधिकार कायद्याचा वापर करत इतरत्र असलेल्या जमिनींचा शोध लावत सर्व कागदपत्रे मिळवण्यात आली आहेत. सणसर (ता. इंदापूर) येथे गट नं. १४६ सुमारे २२ एकर क्षेत्र देवसंस्थानच्या मालकीचे आहे. मात्र, मागील काळातील दुर्लक्षामुळे सध्याचे वहिवाटदार देवसंस्थानला उत्पन्न देण्यास टाळाटाळ करत आहेत. तरंगवाडी (ता. इंदापूर) सुमारे १४ एकर, सांगवी (ता. फलटण) येथे गट नं. ३८४ सुमारे २३ एकर, गिरवी (ता. फलटण) गट नं. १०७५ सुमारे १२ एकर, देगाव (ता. सातारा) येथे गट नं. १७२२ ते १७३४ सुमारे १३ एकर, लिंब (ता. सातारा) गट नं. ३८५ सुमारे ३ एकर, चाकण (ता. खेड) येथे गट नं. २१६० सुमारे ११ एकर, पिसर्वे (ता. पुरंदर) येथे गट नं. ९५३मध्ये सुमारे १४ एकर असे ठिकठिकाणी सुमारे ११३ एकर क्षेत्र जेजुरी देवसंस्थानच्या मालकीचे व वहिवाटीचे आहे. यातील गांभीर्याची बाब म्हणजे गिरवी व सांगवी (ता. फलटण) येथील जमिनीची परस्पर खरेदी-विक्री झाली आहे. तर काही जमिनींच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आले आहेत.

चौकट

जे शेतकरी या जमिनी कसत आहेत, त्यांनी कधीही देवसंस्थानशी संपर्क केला नाही अथवा कोणत्याही स्वरूपात उत्पन्न दिलेले नाही. याबाबत पूर्वी तीन ठिकाणच्या जमिनी सोडल्या तर देवसंस्थांनकडेही कागदपत्रे उपलब्ध नव्हती. देवसंस्थानला या जमिनींचा शोध लागल्यानंतर सनदनाम्यासह सर्व कागदपत्रे मिळवत स्वतंत्र्य शेती विभाग करण्यात आला आहे. तसेच सहधर्मादाय आयुक्त, पुणे कार्यालयात परिशिष्ठ १मध्ये नोंदीसाठी सर्व प्रकरणे पाठविण्यात आली आहेत. दरम्यान, आढळून आलेल्या सर्व जमिनींची सरकारी मोजणी करण्याकरिता भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीची रक्कम भरून अर्ज देण्यात आले आहेत.

चौकट

जे शेतकरी पिढ्यानपिढ्या जमिनी कसत आहेत, त्यांच्याकडून निदान दरसाल उत्पन्न देवसंस्थानच्या तिजोरीत जमा व्हावे, या उद्देशाने संबंधित शेतकऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, प्रतिसाद मिळत नाही. कोट्यवधी रुपयांच्या जमिनींचा मालक जेजुरीचा खंडेराया असला तरी सध्यातरी या जमिनींपासून कोणतेही उत्पन्न अथवा मोबदला मिळत नाही. मात्र, पुढील कायदेशीर प्रक्रिया सध्याच्या विश्वस्त मंडळाकडून राबविण्यात येणार आहे. याबाबत सहधर्मदाय आयुक्त, पुणे यांचे मार्गदर्शन व सूचना घेण्यात येणार असल्याचे विश्वस्त झगडे यांनी सांगितले.

Web Title: 113 acres of land of Jejuri Dev Sansthan in Western Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.