ग्रामीण भागात ११६ व्हेंटिलेटर उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:10 AM2021-06-02T04:10:48+5:302021-06-02T04:10:48+5:30
- पीएम केअरसह सीएसआर निधी मोठी मदत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरी भागासोबतच ग्रामीण भागात ...
- पीएम केअरसह सीएसआर निधी मोठी मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला. परंतु, गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात खासगी व सरकार हाॅस्पिटलमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची संख्या मोठ्याप्रमाणात वाढविण्यात आली. यात ग्रामीण भागातील सराकारी रुग्णालयांमध्येच आजअखेर ११६ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. यात केंद्र शासनाच्या पीएम केअर निधीसह मोठ्या प्रमाणात सीएसआरमध्ये उपलब्ध झाली आहेत.
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा खूपच कमी आहेत. परंतु कोरोना काळात जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात खासगी संस्था, कंपन्यांची मदत घेऊन व्यवस्था निर्माण केली आहे. यामुळेच सध्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात कोविड केअर सेंटर उभे राहिले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात खासगी हाॅस्पिटल ताब्यात घेऊन कोरोना रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्रामीण भागातील शंभर टक्के गंभीर रुग्णांना पुणे, मुंबईमधील हाॅस्पिटल शिवाय पर्याय नव्हता. परंतु गेल्या वर्षभरात ग्रामीण भागातील सरकारी हाॅस्पिटलसह खासगी हाॅस्पिटलमध्ये देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन बेडमध्ये मोठी वाढ झाली. तसेच सरकारी व खासगी हाॅस्पिटल मिळून चारशेपेक्षा अधिक व्हेंटिलेटर बेडदेखील सुरू आहेत. यात संभाव्य कोरोनाची तिसरी लाटेची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सिजन, व्हेंटिलेटरमध्ये आणखी वाढ करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.
------
जिल्ह्यातील सरकारी हाॅस्पिटल्सची संख्या पुढीलप्रमाणे-
हाॅस्पिटल पीएमकेअर सीएसआर
औध रुग्णालय ०७ ०८
बारामती उपरुग्णालय ३० २१
इंदापूर उपरुग्णालय ०८ ०३
मुळशी उपरुग्णालय १० ०७
दौंड उपरुग्णालय ०४ ०३
भोर उपरुग्णालय ०३ ०३
जेजुरी ग्रामीण रुग्णालय -- ०२
नायणगाव ग्रामीण रुग्णालय ०१ ०२
मावळ ग्रामीण रुग्णालय ०२ ०२
एकूण ६५ ५१