अकरावीच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर; ८ सप्टेंबरपर्यंत घेता येणार प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 01:32 PM2022-09-05T13:32:21+5:302022-09-05T13:35:06+5:30
गुरुवारपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार...
पुणे : अकरावी प्रवेशासाठीच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी आज, सोमवारी (दि. ५) सकाळी दहा वाजता जाहीर झाली आहे. या प्रवेश यादीत महाविद्यालय जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुवार (दि. ८) पर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे.
केंद्रीय प्रवेश समितीद्वारे पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. येथे कॅप प्रवेश प्रक्रियेसाठी ९३ हजार ९०६ जागा असून, त्यासाठी ७८ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरले आहेत. प्रवेशाच्या तिनही फेऱ्यांमध्ये केवळ ४५ हजार ४८७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. आता राहिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश यादीकडे लक्ष लागले आहे. या प्रवेश प्रक्रियेत अर्जातील भाग एक आणि दोन पूर्ण भरून अर्ज नव्याने लॉक करून संमती देणाऱ्या विद्यार्थ्यांचाच विशेष फेरीतील प्रवेशाच्या यादीत समावेश केला जाणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तीन नियमित फेऱ्यांमध्ये जागा जास्त उपलब्ध असूनही कमी विद्यार्थ्यांचे प्रवेश जाहीर झाले. त्यामुळे विशेष फेरीच्या यादीत नेमके काय होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.
विशेष फेरीतील प्रवेशासाठी चुरस
त्यासोबतच कोटांतर्गत प्रवेशाची यादीही प्रसिद्ध केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांनाही ८ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेणे अनिवार्य असेल. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळूनसु्द्धा त्यांनी प्रवेश घेण्याचे टाळले आहे. त्यामुळे विशेष फेरीतील प्रवेशासाठी चुरस वाढणार आहे. पुढील फेरी ९ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
अशी आहे अकरावी प्रवेश प्रक्रिया
एकूण महाविद्यालये- ३१५
एकूण प्रवेशक्षमता - ११०९९०
एकूण नोंदणी - १०५९१०
कोटा प्रवेशक्षमता - १७०८४
कोटांतर्गत प्रवेश - ७९७१
कॅप प्रवेशक्षमता - ९३९०६
कॅप अंतर्गत अर्ज - ७३३६६१
एकूण प्रवेश - ४५४८७
रिक्त जागा - ६५५०३