11th admission: पुण्यात अकरावीची तिसरी प्रवेश फेरी प्रक्रिया सुरु; तब्बल १ लाखांहुनही अधिक जागा उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 10:10 AM2022-08-18T10:10:44+5:302022-08-18T10:11:32+5:30
दुसऱ्या फेरीत ४० हजारांवर विद्यार्थ्यांना प्रवेश
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रात अकरावी प्रवेशाची तिसरी प्रवेश फेरी आज, गुरुवार (दि. १८)पासून सुरू झाली आहे. दुसऱ्या फेरीत बुधवार सायंकाळपर्यंत केंद्रीय प्रवेशांद्वारे एकूण ३३ हजार २६०, तर राखीव जागांसह मिळून ४० हजार २३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी २२ ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत दुसऱ्या फेरीतील प्रवेशांसाठीची मुदत बुधवारी संपली. आजपासून तिसरी फेरी सुरू करण्यात येणार आहे.
पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये ३०६ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख ८ हजार ८३० जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी १ लाख ४ हजार ४८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८५ हजार २४० जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे, तर २३ हजार ४०० जागा राखीव काेट्यातून भरल्या जाणार आहेत. यापैकी पहिल्या फेरीत २५ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. दुसऱ्या फेरीत १७ हजार ६२ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला होता.
तिसऱ्या फेरीच्या वेळापत्रकानुसार १८ आणि १९ ऑगस्ट दरम्यान नवीन अर्ज नोंदणी करता येईल. तसेच, प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवता येतील. विद्यार्थ्यांना १८ ऑगस्टला रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल. तसेच २२ ऑगस्टला तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयांचे प्रवेश जाहीर करण्यात येणार आहेत.
नऊ हजार विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ
दुसऱ्या फेरीत जवळपास नऊ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे, तर २४ ऑगस्टला कनिष्ठ महाविद्यालयांना कोट्यातील जागा समर्पित करता येतील, तर २५ ऑगस्टपासून पुढील फेरीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या कालावधीत राखीव जागांवरील (कोटा) प्रवेश प्रक्रिया, द्विलक्षी (बायफोकल) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.