सराईत गुन्हेगारांकडून १२ गुन्हे उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:10 AM2021-04-20T04:10:56+5:302021-04-20T04:10:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघा चोरट्यांना पकडून दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने त्यांच्याकडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघा चोरट्यांना पकडून दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने त्यांच्याकडून १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
अजिनाथ लक्ष्मण गायकवाड (वय २४, रा. कृष्णानगर, मोहमंदवाडी) आणि नागेश मनोहर वाकडे (वय २०, रा. वाडकर चाळ, मोहमंदवाडी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ५ चारचाकी गाड्या, ३ दुचाकी वाहने अशी ८ वाहने व जबरी चोरीतील माल असा एकूण ८ लाख ४६ हजार १०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे अंमलदार हडपसर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना दोघे जण नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर ती दुचाकी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे निष्पनन झाले. तसेच वानवडी भागात त्यांनी एक जबरी चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले.
त्यांच्याकडे केलेल्या अधिक तपासात त्यांनी विश्रांतवाडी, फरासखाना, लोणी काळभोर, मुंढवा, खडकी, हडपसर तसेच लातूर येथे वाहनचोरी केल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून एकूण ८ वाहने व जबरी चोरीतील माल असा ८ लाख ४६ हजार १०० रुपयांचा माल जप्त केला आहे. लातूर जिल्ह्यातील विवेकानंद पोलीस ठाण्याकडील दोन वाहनचोरी व एक घरफोडीचा प्रयत्न असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहे.
अजिनाथ गायकवाड यांच्याविरुद्ध यापूर्वी जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी असे १५ गुन्हे दाखल आहेत. नागेश वाकडे याच्याविरुद्ध ३ गुन्हे दाखल आहेत.
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर, उपनिरीक्षक गुंगा जगताप, सहायक उपनिरीक्षक कांबळे व त्यांच्या पथकाने केली आहे.