पुण्यात कोंबडी चोरांचा सुळसुळाट! चोरट्यांनी चक्क कोंबड्यांनी भरलेला टेम्पोच लुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 11:25 AM2022-04-01T11:25:41+5:302022-04-01T11:28:55+5:30
संपूर्ण टेम्पो लंपास केल्याची घटना...
वडगाव मावळ : नायगयाव गावच्या हद्दीतील जुना मुंबई-पुणे महमार्गावरील अहिरवडे फाट्यावर कोंबड्या चोरांनी बुधवारी (दि.३०) मध्यरात्री बॉयलर कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो अडवून टेम्पो चालक व सहचालकास शस्त्रांचा धाक दाखवून कोंबड्यांचा संपूर्ण टेम्पो लंपास केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात टेम्पो चालक चालक यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.३०) रात्री साडेबारा वाजल्याच्या सुमारास टेम्पो चालक जमाल अहमद अताउल्ला खान, ( वय ३५ वर्ष) हे टाटा कंपनीचा ७०९ मॉडेलचा टेम्पो (क्र. एम एच ४३ बीपी ५२०४) मध्ये पोल्ट्री फार्मचे जिवंत कोंबड्यांचा माल जात होते. त्यावेळी टेम्पो नायगयाव गावच्या हद्दीतील मिनी महल हॉटेलचे समोर आला असताना एका पांढऱ्यां रंगाच्या बुलेटवर आलेल्या चार अनोळखी इसमांनी सदरचा टेम्पो रस्त्यात अडवला. त्यानंतर टेम्पो चालकाला आणि क्लिनरच्या गळ्याला कोयता लावून, हाताने मारहाण करून टेम्पो व त्यातील माल असा एकूण रुपये १२ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जबरदस्तीने चोरी करून पुण्याच्या दिशेने पसार झाले.
या संदर्भात टेम्पो चालक खान यांनी पोलीस ठाण्यात दिललेल्या तक्रारीच्या तपासाच्या अनुषंगाने कामशेत पोलिसांचे पथक तपास करीत असताना गुरुवारी (दि.३१) पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सदरचा टेम्पो हा मोशी कचरा डेपोकडे जाणारे रोडवर, पुणे नाशिक महामार्गाजवळ, ता. हवेली, जि. पुणे येथे उभा असल्याची माहिती मिळाली. त्यावरून कामशेत पोलीस पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला टेम्पो (क्र. एम एच ४३ बीपी ५२०४) मोशी येथून हस्तगत करून तो पुढील तपासकामी ताब्यात घेतला असून गुन्ह्यातील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहायक फौजदार अब्दुल शेख, पोलीस हवालदार गणेश तावरे, पोलीस नाईक गवारी, दत्ता शिंदे यांचे पथक करत आहेत.