पुणे महानगरपालिकेच्या सर्वेक्षण कामाला दांडी मारणे उपशिक्षकांना भोवले; बारा जण निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 08:40 PM2020-04-28T20:40:56+5:302020-04-28T20:49:34+5:30
पालिकेने शहरात सर्वेक्षण करण्याकरिता जवळपास एक हजार पथके तयार केली आहेत.
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या कामासाठी नेमलेल्या महानगरपालिकेच्या उपशिक्षकांना कामावर दांडी मारणे चांगलेच भोवले असून अशा तब्बल बारा शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. या उपशिक्षकांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली असून याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिले आहेत. पालिकेने शहरात सर्वेक्षण करण्याकरिता जवळपास एक हजार पथके तयार केली आहेत. या पथकांमध्ये शिक्षक-उपशिक्षकांचाही समावेश करण्यात आला आहे.
पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे क्षेत्रीय स्तरावर सर्वेक्षणासाठी सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव
यांच्याकडे समन्वयाचे काम देण्यात आले आहे. उपशिक्षकांनी त्यांच्याकडे हजर होणे आवश्यक आहे. परंतु, पालिकेच्या ४५ उपशिक्षकांनी कामाला गैरहजेरी लावली. या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. परंतु त्यांनी कोणताही खुलासा केला नाही. हे उपशिक्षक कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता अथवा कोणतीही वैद्यकीय रजा व अर्जित रजेची मान्यता न घेता परगावी गेल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वेक्षणाच्या कामावर गैरहजर राहिलेल्या ४५ उपशिक्षकांना सर्वेक्षण कामासाठी २४ तासांच्या आत हजर व्हावे अन्यथा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ (२) (क) नुसार निलंबित करण्यात येईल अशी कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली होती. नोटीस मिळताच ३२ शिक्षक कामावर हजर झाले. तर एका शिक्षिकेला वैद्यकीय कारणास्तव रजा मंजूर करण्यात आली. परंतु अद्यापही १२ उप शिक्षक गैरहजर असून त्यांचा कोणताही खुलासा अद्याप पर्यंत प्राप्त झालेला नाही. या शिक्षकांचे वर्तन नियमबाह्य, निष्काळजीपणा व हलगर्जीपणाचे असल्याने या १२ उपशिक्षकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. या उपशिक्षकांची खातेनिहाय चौकशी लावण्यात आली असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
--------
निलंबित उपशिक्षकांची नावे
स्वरदा प्रवीण चव्हाण, निलेश श्रीरंग मोरे, विजया लालासाहेब वाघ, मोहिनी चंद्रकांत मेमाणे, किसन चींधू कवटे, माधवी किशोर घाडगे, केशव गुलाबराव वाघमारे, सुजाता संपत राऊत, राजेंद्र महाद दिवटे, राहुल भागुजी जाधव, शिरीन इसाक मुजावर, चंद्रसिंग अमरसिंग पवार.