अमेरिकेत १८ महिन्यांत १२ शस्त्रक्रिया, पण पुण्यातील एका शस्त्रक्रियेने बदलले आयुष्य, जेनिफर हेस यांचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 02:05 PM2024-07-11T14:05:30+5:302024-07-11T14:07:37+5:30
पुण्यातील आराेग्य सुविधा इतक्या ॲडव्हान्स झाल्या आहेत की त्या देखील परदेशातील नागरिकांना भुरळ पाडत आहेत
पुणे : ‘एप्रिल २०२० मध्ये मला फिस्टुलाचे निदान झाले. अमेरिकेत त्यावर एका प्रतिष्ठित कोलोरेक्टल सर्जनकडून १८ महिन्यांत १२ शस्त्रक्रियांनंतरही काहीच आराम न मिळाल्याने मग आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. पण, त्यामुळे पुढे ‘क्राेन्स’सारखी व्याधी बळावली. अखेर पुण्यातील हीलिंग हँड्समधील सर्जन डाॅ. अश्विन पाेरवाल यांच्याकडून शस्त्रक्रिया करवून घेतल्यावर मी अखेर बरी झाले. आता मी काेणत्याही बंधनाशिवाय माझे आयुष्य हवे तसे जगत आहे,’ असा अनुभव अमेरिकेतील अटलांटा येथे राहणाऱ्या जेनिफर हेस हिने ‘फिस्टुला फ्री’ या वेबसाइटवर व्यक्त केला आहे.
आपण अनेकदा उपचार घेण्यासाठी परदेशात गेल्याचे ऐकताे. परंतु, आता पुण्यातील आराेग्य सुविधा इतक्या ॲडव्हान्स झाल्या आहेत की त्या देखील परदेशातील नागरिकांना भुरळ पाडत आहेत. त्याचे उदाहरण म्हणजे जेनिफर. जेनिफरला फिस्टुलासह इतर गुंतागुंत झाली हाेती. अमेरिकेत तब्बल १२ शस्त्रक्रिया करूनही आराम मिळाला नाही. तेव्हापासून ती चांगल्या सर्जनच्या शाेधात हाेती. मग तिने फेसबुकवर पुण्यातील हीलिंग हँड्सविषयी वाचले, अधिक माहिती घेतली व पुण्याला उपचार करण्याचा निर्णय घेतला.
जेनिफर सप्टेंबर २०२३ मध्ये तिचे पती, आईवडील आणि १४ महिन्यांच्या बाळासह पुण्यात आले. तपासणी केली असता तिचा फिस्टुला व क्राेन्सचा आजार हा लेव्हल पाचला म्हणजे खूपच गंभीर अवस्थेला पाेचला हाेता. ताे बरे करणे ही अशक्य बाब वाटत हाेती. परंतु, शस्त्रक्रियेनंतर त्यानंतर आठ आठवडे राहून पूर्ण जखम भरेपर्यंत त्यांनी पुण्यातच मुक्काम केला. तसेच, पुन्हा ही व्याधी हाेणार नाही, याची काळजी येथे घेतली जाते, येथील स्टाफनेही खूप मदत केली, अशा भावना जेनिफरने व्यक्त केल्या.
मी अमेरिकेतील उपचार पद्धतीवरील विश्वास गमावला हाेता व निराशही झाले हाेते. परंतु, डाॅ. पाेरवाल यांच्या बातम्यांचे लेख, वैद्यकीय जर्नल्स अभ्यास वाचले. त्यांनी स्वत: शोधलेल्या डीएलपीएल लेसर तंत्राने आंतरराष्ट्रीय रुग्णांना बरे केल्याचेही वाचले. त्यांनी उपचार केलेल्या अमेरिकेतील अनेक लोकांशी फोनवर बाेलल्यानंतर मी पुण्यात उपचार घेण्याचा निर्णय घेतला. आता मी पूर्णपणे व्याधीमुक्त जीवन जगत आहे. - जेनिफर हेस, अटलांटा, अमेरिका