बारावीच्या विद्यार्थ्यांना ३ एप्रिलपासून मिळणार हॉल तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 05:12 PM2021-04-01T17:12:54+5:302021-04-01T17:13:26+5:30
राज्यमंडळतर्फे इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिलपासून सुरू केल्या जाणार आहे
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे 2021 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) येत्या 3 एप्रिलपासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येणार आहे.
सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्राची प्रत प्रिंट करून द्यावी. त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारू नये, अशा स्पष्ट सूचना राज्य मंडळातर्फे देण्यात आले आहेत.
राज्य मंडळा तर्फे इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल पासून सुरू केल्या जाणार आहेत या परीक्षांसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश पत्राची ऑनलाईन प्रिंट काढून द्यायची आहे. विद्यार्थ्यांनी या प्रिंट आउटवर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का घ्यावी.
हॉल तिकीटमध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्याच्या दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत.त्याचप्रमाणे हॉल तिकीट वरील फोटो स्वाक्षरी विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडून हॉल तिकीट गहाळ झाल्यास त्याला पुनश्च प्रिंटआउट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन हॉल तिकीट द्यायचे आहे. फोटो सदस्य असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिटकून संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी त्यावर शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.