पीएमआरडीएच्या विकास आराखड्याला १२ गावांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:14 AM2021-09-17T04:14:00+5:302021-09-17T04:14:00+5:30
दावडी: पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) विकास आराखड्याच्या विरोधात पूर्व भागातील सेझ परिसरातील गावांनी विरोध दर्शविला आहे. बारा ...
दावडी: पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) विकास आराखड्याच्या विरोधात पूर्व भागातील सेझ परिसरातील गावांनी विरोध दर्शविला आहे. बारा गावांतील ग्रामस्थांनी धामणटेक (ता. खेड) येथे आंदोलन करून आराखड्याचा निषेध व्यक्त केला आहे.
सेझ परिसरातील रेटवडी ,गोसासी ,निमगाव ,दावडी, कनेरसर ,पूर ,वरुडे ,गाडकवाडी, वाफगाव व इतर गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी प्रस्तावित विकास आराखड्यास तीव्र विरोध करून धामणटेक येथे समर्थ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष विजयसिंह शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सेझ परिसरातील औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात असताना आजूबाजूच्या गावांमध्ये वाढत्या नागरीकरणामुळे भविष्यात आवश्यक असणाऱ्या रहिवासी व कमर्शियल झोनची आवश्यकता असताना पीएमआरडीने स्थानिक स्वराज्य संस्था व नागरिकांना विश्वासात न घेता फक्त ग्रीन १ व ग्रीन- असे झोन टाकले आहे. त्याला विरोध आहे.
वाढत्या नागरीकरणामुळे स्थानिकांना भविष्यात व्यवसाय करण्यास अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे सेझ परिसरातील गावांचे झोन बदलण्यात यावे, तसेच अनेक चुकीची आरक्षण टाकण्यात आलेले आहेत, ती बदलण्याची मागणी नागरिकांनी या वेळी केली आहे. आंदोलनाचे प्रास्ताविक मारुती गोरडे यांनी केले. विजयसिंह शिंदे पाटील यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. या वेळी गाडकवाडीचे सरपंच वैभव गावडे, गोसासीचे सरपंच संतोष गोरडे, कनेससरचे सरपंच सुनीता केदारी, दावडीचे सरपंच आबा घारे, वाफगावचे सरपंच उमेश रामाणे, निमगावचे उपसरपंच संतोष शिंदे, दिलीप डुबे, मारूती गोरडे, दिलिप माशेरे, बापू पठारे व शेतकरी उपस्थित होते.
.............................................................
खेड तालुक्याच्या पूर्व भागात यापूर्वी सेझ प्रकल्प आला आहे. पूर्व भागात कायम पाणीटंचाई असते. या भागात ग्रीन झोन करून काय फायदा होणार आहे. ग्रीन झोन करताना गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही. शेतकऱ्यांच्या जामिनीतून ५० फुटांचे रस्ते टाकण्यात आले आहे. पीएमआरडीएने ऑगस्ट २०२१ मध्ये पुढील वीस वर्षाकरिता डेव्हल्पमेंट प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार पूर्व भागातील गोसासी, निमगाव, गाडकवाडी, चिंचबाईवाडी, वाफगाव, गुळाणी रेटवडी, कनेरसर, पूर,दावडी, वरुडे , चौधरवाडी, वाकळवाडी या गावात ग्रीन झोन दाखविण्यात आला आहे. भविष्यात ग्रीन झोनमध्ये शेती व्यतिरिक्त शेतीपूरक व्यवसाय सोडून कुठलाही व्यवसाय करता येणार नाही. ग्रीन झोन बदलावा, अन्यथा मोठ्या स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल.
विजयसिंह शिंदे-पाटील ( संस्थापक अध्यक्ष, समर्थ फाऊंडेशन)
१६ दावडी
पीएमआरडीएच्या विकास आराखड्याला पूर्व भागातील गावांनी आंदोलन करून विरोध दर्शविला.