अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणा-याला १२ वर्ष सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 08:30 PM2019-01-08T20:30:44+5:302019-01-08T20:33:29+5:30
पत्ता सांगण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून घेऊन जात तिच्यावर बलात्कार करणा-याला १२ वर्षे सक्तमजुरी आणि २१ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.
पुणे : पत्ता सांगण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून घेऊन जात तिच्यावर बलात्कार करणा-याला १२ वर्षे सक्तमजुरी आणि २१ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली . विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी हा निकाल दिला.
नितीन मारुती ननावरे ( वय ३४, रा. दामोदर बिल्डींग, बिबवेवाडी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली होती. २८ मे २०१२ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित नऊ वर्षीय मुलगी घटनेच्या दिवशी तिच्या घराजवळील एका सुपर मार्केटमधून पोहे आणि शेंगदाणे घेऊन घरी येत होती. आरोपी तिच्या पाठीमागून दुचाकीवरुन आला. माझी बहिण आणि मुलगी आराधना स्वीट होमजवळ उभी असून आम्ही या भागात नवीन आहोत. तू माझ्याबरोबर तेथे चल. त्यांना घेवू त्यानंतर तुला घरी सोडतो. तसेच तुझ्या आईचा मोबाइल नंबर दे, या बाबत आईला सांगतो, असे आरोपीने तिला सांगितले. त्यानंतर ननावरे याने पीडित मुलीच्या आईला फोन लावल्याच्या बहाणा केला. त्यामुळे ननावरेवर विश्वास निर्माण झाल्याने पीडिता त्याच्या गाडीवर बसली. ननावरे तिला दुचाकीवर बसवून अप्पर इंदिरानगर लेक टाऊन रोडवरील एका बिल्डींगमधील दुस-या मजल्यावर घेवून गेला. त्यानंतर तिच्यावर चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला.
या खटल्याचे कामकाज सरकारी वकील लीना पाठक यांनी पाहिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी तपासी अधिकारी म्हणून काम पाहिले. पोलीस कर्मचारी आर. एन. नागवडे यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलीची आई, स्केच आर्टिटीस्ट, केमिकल अॅनालिसिस रिपोर्ट, ओळखपरेड यात महत्त्वाची ठरली. दंडाच्या रकमेतून पीडित मुलीला दहा हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.