अकरावीच्या तिसऱ्या फेरीतून १२ हजार प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:28 AM2020-12-16T04:28:51+5:302020-12-16T04:28:51+5:30
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिक कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाच्या तिसऱ्या फेरीतून केवळ १२ हजार ४६१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला ...
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिक कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाच्या तिसऱ्या फेरीतून केवळ १२ हजार ४६१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे .त्यामुळे अजूनही तब्बल ५० हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. परिणामी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यास जानेवारी उजाडणार असल्याचे दिसून येत आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. मंगळवारी आकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश समितीतर्फे तिसऱ्या फेरीच्या प्रवेशाची यादी जाहीर केली. या फेरीसाठी ५१ हजार १०७ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी अर्ज केलेल्या ३३ हजार ६६१ विद्यार्थ्यांपैकी केवळ १२ हजार ४६१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यात कला शाखेच्या १ हजार ३४३ वाणिज्य शाखेच्या ५ हजार ३०३ तर विज्ञान शाखेच्या ५ हजार ६८३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
-------
चुकीचे पसंतीक्रम भरल्याने मिळेना प्रवेश
सर्वच विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा, असे वाटते. मात्र, नामांकित महाविद्यालयांचा कट ऑफ आणि विद्यार्थ्यांना मिळालेले गुण यात खूप मोठी तफावत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा कट ऑफ विचारात घेवून प्रवेश अर्जात योग्य पसंती क्रम भरले तरच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांचा विचार करून अर्ज भरावेत, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केले आहे.
----
प्रवेश मिळण्याच्या संख्येत घट; घेणारेही झाले कमी
ऑनलाईन प्रवेशासाठी घेतल्या जात असलेल्या प्रवेश फेऱ्यांमधून प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत चालली आहे. पहिल्या फेरीतून ४० हजार विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीतून २३ हजार तर तिसऱ्या फेरीतून केवळ १२ हजार ४६१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. पहिल्या फेरीतून ऑनलाईन प्रवेश फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थांपैकी २३ हजार विद्यार्थ्यांनी तर दुसऱ्या फेरीतून ९ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.
--
पसंतीक्रमानुसार मिळालेल्या प्रवेशाची माहिती
पहिला - २,५४३
दुसरा - २,७७३
तिसरा - १,९६८
चौथा - १,४०७
पाचवा - १,१४७