१२२ अंगणवाड्यांना मिळणार हक्काचे छत
By admin | Published: January 10, 2017 02:42 AM2017-01-10T02:42:26+5:302017-01-10T02:42:26+5:30
वैैयक्तिक लाभाच्या योजनांवर फुली मारल्यामुळे अंगणवाड्यांना हक्काची इमारत मिळणार असून जिल्ह्यात १२२ अंगणवाड्यांना मंजुरी
पुणे : वैैयक्तिक लाभाच्या योजनांवर फुली मारल्यामुळे अंगणवाड्यांना हक्काची इमारत मिळणार असून जिल्ह्यात १२२ अंगणवाड्यांना मंजुरी देण्यात आली असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
मात्र दुर्गम अशा वेल्हा व मुळशी तालुक्यात इमारतीसाठी जागाच नसल्याने एकही अंगणवाडीची इमारत मिळाली नाही. या वेळी महिला व बालकल्याण विभागाच्या अध्यक्षा वंदना धुमाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे व कृषी सभापती सारिका इंगळे उपस्थित होत्या.
शासनाने नुकताच वैयक्तिक लाभाच्या योजनांचा निधी हा थेट लाभार्थींच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो.
नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष प्रदीप कंद यांनी वय्ौक्तिक लाभाच्या योजनांचा निधी शाश्वत विकासासाठी वापरणार असल्याचे सांगितले होते.
त्या वेळी त्यांनी अंगणवाड्या इमारतींसाठी १० कोटी १ लाख ५९ हजार ४७५ रुपये वर्ग करण्यात आल्याचेही स्पष्ट केले होते.
त्यानुसार सोमवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ११ कोटींच्या निधीतून जिल्हा परिषद निधीतून १२२ नवीन अंगणवाड्यांच्या इमारती करण्यात येणार आहेत. तसेच गेल्या वर्षी जिल्हा नियोजनमधून २३९ अंगणवाड्यांना प्रत्येकी ६ लाख रुपये देण्यात आले होते. ती रक्कम कमी पडत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार या प्रत्येक अंगणवाड्यांना १ लाख असे २ कोटी ३९ लाख देण्यात आल्याचे सांगितले.
असा ११ कोटींचा निधी जिल्हा परिषद निधीतून अंगणवाड्यांना देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद निधी व जिल्हा नियोजनचा निधी यातून या वर्षात ३६१ इमारती होणार आहेत. (वार्ताहर)
वेल्हा, मुळशीत जागाच उपलब्ध नाही
वेल्हे तालुक्यात १०८ अंगणवाड्या आहेत. त्यापैैकी ८८ ठिकाणीि इमारती आहेत. २० अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही. तसेच मुळशी तालुक्यात १८३ अंगणवाड्या आहेत. त्यापैैकी ६७ ठिकाणी इमारती आहेत. उर्वरित ११६ ठिकाणी इमारत नाही. मात्र या दोन तालुक्यांत इमारती देण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने एकही नवी इमारत देता आली नसल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे यांनी या वेळी सांगितले. मी जागेबाबत गटविकास अधिकारी, पंचायत समिती सभापती व तेथील आमदारांशीही संपर्क साधला, मात्र कोणीही जागा उपलब्ध करून दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१७८७ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही
जिल्ह्यात ४ हजार ६०३ अंगणवाड्या असून २ हजार ८१५ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे. १ हजार ७८७ अंगणवाड्यांना इमारत नाही. या अंगणवाड्या समाजमंदिर, प्राथमिक शाळा, खासगी जागेत भरतात. त्यापैैकी ९०२ ठिकाणी जागा उपलब्ध नाही, तर ४२९ ठिकाणी जागा आहे.