‘जलस्वराज्य’साठी १२२ गावे
By Admin | Published: October 19, 2015 01:57 AM2015-10-19T01:57:58+5:302015-10-19T01:57:58+5:30
गावांना स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पाणी देण्यासाठी असलेला शासनाचा जलस्वराज्य १ प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आता जलस्वराज्य २ येत आहे. यात जिल्ह्यातील १२२ गावांची निवड करण्यात आली आहे.
भोर : गावांना स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पाणी देण्यासाठी असलेला शासनाचा जलस्वराज्य १ प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आता जलस्वराज्य २ येत आहे. यात जिल्ह्यातील १२२ गावांची निवड करण्यात आली आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळणार आहे.
जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यातील ग्रामीण भागात मागणी व लोकसहभाग तत्त्वावर जलस्वराज्य कार्यक्रम राबविला जात आहे. ग्रामीण भागाला गुणवत्तापूर्ण, शाश्वत व पुरेसे पाणी पुरवणे हा मुख्य हेतू आहे. राज्यातील ३३ पैकी १२ जिल्ह्यांत जलस्वराज्य २ हा कार्यक्रम राबविला जात आहे.
जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सार्वजनिक आरोग्य विभाग, पंचायत समिती व ग्रामपंचायती यांच्यामार्फत याचे नियंत्रण ठेवले जाणार आहे.
यात निमशहरी घटकांतर्गत १९, पाणीटंचाईग्रस्त घटकांतर्गत २८, पाणी गुणवत्ताबाधित घटकांतर्गत २३, भूजलस्तर जलधर व्यवस्थापन घटकांतर्गत ५२ अशी १२२ गावे वाड्या-वस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. (वार्ताहर)
वाढते औद्योगिकीकरण, रासायनिक खतांचा अतिवापर, शेती वापरासाठी भूजलचा अतिउपसा होण्याचे
प्रमाण वाढले आहे. त्यात विद्राव्य क्षार व फ्लोराइड आणि रासायनिक घटकांमुळे पाणी बाधित झाल्याचे आढळून आले आहे. हे पाणी प्यायल्याने वाड्या-वस्त्यांवरील लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. म्हणून जलस्वराज्य
२ अंतर्गत १२ जिल्ह्यांत गुणवत्ताबाधित गावांना स्वच्छ, शुद्ध, सुरक्षित पाणीपुरवठ्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गावांत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत जलधर व्यवस्थापनमधून आंबेगाव, इंदापूर, खेड, शिरूर, पुरंदर तालुक्यात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे गावांत ५०० पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या लहान वाड्या-वस्त्यांमध्ये सुविधा करण्यात येणार आहेत. त्यासाठी भोर, आंबेगाव, मुळशी, जुन्नर, खेड, वेल्हे या तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात आला आहे. गावे निमशहरी घटकांतर्गत निवडण्यात आली आहेत. ज्या गावांची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २५ हजारांपेक्षा कमी आहे. निमशहरी भाग, नगरपालिका नगर परिषद यांच्यालगत आहे, अशी जुन्नर, शिरूर, पुरंदर, इंदापूर व दौंड तालुक्यातील गावे यात आहेत. .