१२३ विद्यार्थ्यांना प्रवेश
By admin | Published: October 16, 2015 01:23 AM2015-10-16T01:23:02+5:302015-10-16T01:23:02+5:30
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागेवर प्रवेश नाकारलेल्या पहिल्या फेरीतील एकूण १२३ विद्यार्थ्यांना गुरुवारी नव्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागेवर प्रवेश नाकारलेल्या पहिल्या फेरीतील एकूण १२३ विद्यार्थ्यांना गुरुवारी नव्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला. मात्र, अद्यापही उर्वरित विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे दुसरी फेरी सुरू होणार कधी आणि प्रवेश होऊन मुले शैक्षणिक वर्षाला सुरुवात कधी करणार, याविषयीची चिंता पालकांमध्ये आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मुलांना २५ टक्के आरक्षित जागेवर प्रवेश देणे बंधनकारक असतानाही पुण्यातील १४ शाळांनी प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे एकूण ४०७ मुलांच्या प्रवेशाचा प्रश्न रखडला होता. यासाठी बुधवारी व गुरुवारी दोन दिवस त्यांना पर्यायी शाळा देण्यासाठी सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये बुधवारी ६५ जणांना प्रवेश दिला होता, तर गुरुवारी ५८ जणांना प्रवेश देण्यात आला. तसेच, ५ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला. एकूण १२३ जणांना नवी शाळा मिळाली, तरीही शिक्षण हक्क कायद्यातील सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या भविष्याचा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत.
शिक्षण मंडळाचे प्रमुख बबन दहीफळे म्हणाले, ‘‘गुरुवारअखेरपर्यंत १२३ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे, तर ५ जणांनी प्रवेश नाकारला. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल. मात्र, शैक्षणिक सत्रातील पहिले ३ महिने उलटले तरी अद्याप पहिली फेरीच पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर, दुसरी फेरी जाहीर होऊन कधी पूर्ण होईल, याबाबत पालकांच्या मनात शंका आहे.’’
दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी झालेल्या उशिराला प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक महावीर माने यांच्यासह शिक्षण विभागातील अनेक अधिकारी जबाबदार आहेत. जर विद्यार्थ्यांना ८ दिवसांत प्रवेश दिला नाही, तर शाळांबरोबरच अधिकाऱ्यांबाबतही अवमान याचिका दाखल करण्यात येईल. न्यायालयाचे आदेश असूनही तसेच याबाबत शिक्षण विभागाला वेळोवेळी निवेदने देऊनही शिक्षण विभागाने कारवाईत दिरंगाई केल्याचे दिसून आले.