जिल्ह्यातील १२५९ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:12 AM2021-04-08T04:12:10+5:302021-04-08T04:12:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरी भागासोबतच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु कोरोनाच्या या दुसऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरी भागासोबतच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत शहरी भागातील लोकांचा ग्रामीण भागाकडे येणारा लोढा अद्याप सुरू झाला नसल्याने जिल्ह्यातील १४०५ ग्रामपंचायतींपैकी आज अखेर केवळ १४५ ग्रामपंचायतींमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत आहे. आजही तब्बल १२५९ गावांनी कोरोनाला गावांच्या वेशीवरच रोखले आहे.
पुणे जिल्ह्यात गत वर्षी ९ मार्च रोजी पुणे शहरामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर पहिले काही महिने कोरोनाचा प्रादुर्भाव शहरी भागा पुरताच मर्यादेत राहिला. परंतु, शासनाने संपूर्ण लाॅकडाऊन जाहिर केल्यानंतर पुणे-मुंबई सारख्या कोरोनाचा हाॅटस्पाॅट असलेल्या शहरातून लोकांचे लोढेच्या लोढे गावाकडे येऊ लागले. यामुळे शहरी भागा सोबतच ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजे ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या ८००ते ९०० च्या घरात गेली होती. यात ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील तब्बल शंभर ग्रामपंचायतींमध्ये कोरोनांचा मोठा उद्रेक झाला होता. हवेली, खेड, शिरूर, दौंड सारख्या औद्योगिक क्षेत्र असलेल्या तालुक्यातील काही गावांमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली होती. नंतर बहुतेक गावांनी कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
परंतु, आता पुन्हा एकदा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पहिल्या लाटेत ८००-९०० घरात असलेली रुग्ण संख्या आता ११००-१२०० घरात गेली आहे. परंतु, तरी देखील ग्रामीण भागातील परिस्थिती अद्याप नियंत्रणात आहे.
---
- जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण कधी आढळला - ९ मार्च
- सद्यस्थितीत किती रुग्ण - १०२२६
- शहरी किती - ९०३७
- ग्रामीण किती - ११८९
- एकूण मृत्यू किती - १०३४०
- किती लोकांनी कोरोनावर मात केली - ५०१४४६
- जिल्ह्यात एकूण गावे किती - १४०५
- किती गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही - १२५९
----
जिल्ह्यात उपाययोजनांवर अधिक भर
ग्रामीण भागात सुरूवाती पासूनच विविध उपाययोजनांवर अधिक भर दिला. यामध्ये रुग्णांचे ट्रेसिंग, टेस्टिंग आणि उपचार यावर जास्त लक्ष दिले. सध्या शहरा लगतच्या व औद्योगिक वसाहती लगतच्या गावांमध्ये कोरोनाचे अधिक रुग्ण सापडत आहेत. लसीकरणावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
- डाॅ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
---
गावांमध्ये स्वयंशिस्त महत्त्वाची
जिल्ह्यात सध्या दररोज हजार-बाराशे रुग्ण सापडत असले तरी पहिल्या टप्प्यात ज्या प्रमाणात खेड्यापाड्यात कोरोना पोहचले तशी सध्या परिस्थिती नाही. गावांमध्ये स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. या स्वयंशिस्तीमुळे अनेक गावे कोरोनाच्या प्रादुर्भावा पासून दूर आहेत.
- निर्मला पानसरे, जिल्हा परिषद अध्यक्षा