12th Exam : पाच वर्षांत कॉपीची प्रकरणे आढळलेल्या परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक/पर्यवेक्षकांची अदलाबदल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:36 IST2025-02-11T13:32:02+5:302025-02-11T13:36:38+5:30

पाच वर्षांत कॉपीची प्रकरणे आढळलेल्या परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक/पर्यवेक्षकांची अदलाबदल 

12th Exam | 12th Exam : पाच वर्षांत कॉपीची प्रकरणे आढळलेल्या परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक/पर्यवेक्षकांची अदलाबदल 

12th Exam : पाच वर्षांत कॉपीची प्रकरणे आढळलेल्या परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक/पर्यवेक्षकांची अदलाबदल 

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेवेळी पाच वर्षांत ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार आढळून आले आहेत, अशा राज्यातील एकूण ३ हजार ३७६ परीक्षा केंद्रांपैकी ८१८ केंद्रांवरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांची अदलाबदल करण्यात आली असून, परीक्षेशी संबंधित कामांसाठी त्या केंद्रांवर समाविष्ट शाळांव्यतिरिक्त अन्य शाळांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच यंदाच्या वर्षी दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपीची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा केंद्र म्हणून मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्याबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने कॉपीमुक्त अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार बारावी व दहावीच्या सर्व परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांची अदलाबदल करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला होता. मात्र, परीक्षा केंद्रावर परीक्षा देणाऱ्या शाळांतील शिक्षक, कर्मचारी आणि संघटनांनी परीक्षेच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.

त्याची दखल घेत राज्य मंडळाने निर्णयात अंशतः बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोरोना काळातील, २०२१ आणि २०२२ या परीक्षा वगळून २०१८, २०१९, २०२०, २०२३ आणि २०२४ या पाच वर्षांतील दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाले आहेत, त्या परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित कामांसाठी त्या केंद्रांवरील समाविष्ट शाळांव्यतिरिक्त अन्य शाळांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार हे बदल करण्यात आले असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

Web Title: 12th Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.