बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरूवात, पहिल्याच दिवशी ५८ काॅपीबहाद्दरांवर कारवाई
By प्रशांत बिडवे | Published: February 21, 2024 09:28 PM2024-02-21T21:28:13+5:302024-02-21T21:29:09+5:30
राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार राेखण्यासाठी कडक पावले उचलण्यात येत आहेत.
पुणे : राज्य मंडळाच्या बारावी परीक्षेला दि. २१ बुधवारपासून सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी राज्यातील विविध विभागीय मंडळाच्या परीक्षा केंद्रांमध्ये इंग्रजी विषयाच्या परीक्षेत गैरमार्ग म्हणजेच काॅपी केल्याचे ५८ प्रकार उघडकीस आले आहेत. छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि लातूर विभागीय मंडळात सर्वाधिक घटना घडल्या आहेत. तर पुणे विभागीय मंडळातील परीक्षा केंद्रावर १५ प्रकारांची नोंद झाली आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार राेखण्यासाठी कडक पावले उचलण्यात येत आहेत. मंडळातर्फे राज्यभरात पावणेतीनशे भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तसेच बारावी परीक्षेदरम्यान काॅपी करण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी शाळांसह अधिकाऱ्यांना खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
इंग्रजी विषयाच्या परीक्षेत काॅपी केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील परीक्षा केंद्रावर सर्वाधिक २६ घटनांची नाेंद झाली आहे. त्यापाठाेपाठ पुणे विभागीय मंडळात १५ आणि लातूर विभागीय मंडळात १४ तसेच नाशिक ०२ आणि नागपूर १ असे एकुण ५८ घटनांची नाेंद झाली आहे. तसेच मुंबई, काेल्हापूर, अमरावती आणि काेकण विभागीय मंडळातील परीक्षा केंद्रावर एकही काॅपीचा प्रकार घडला नसल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली.
गैरमार्ग प्रकाराची संख्या -
छत्रपती संभाजीनगर : २६
पुणे : १५
लातूर : १४
नाशिक : ०२
नागपूर : ०१