HSC / 12th Exam: बारावी परीक्षेच्या काॅपी प्रकरणातील दाेषींची हयगय केली जाणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 09:12 PM2023-03-01T21:12:27+5:302023-03-01T21:12:34+5:30
नियमानुसार त्यांची वेतनवाढ थांबविणे आणि निलंबित करणे आदी गंभीर स्वरूपाच्या शिक्षाही देण्यात येणार
पुणे: केडगाव येथील शाळेत बारावी फिजिक्स विषयाच्या पेपरमध्ये काॅपी प्रकरणाची पुणे विभागीय मंडळाकडून चाैकशी करण्यात येणार आहे. त्यामध्ये दाेषी आढळणाऱ्यांची हयगय केली जाणार नसून चाैकशीमध्ये दाेषी आढळलेल्यांवर कारवाई तसेच शिक्षा करण्यात येणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी सांगितले.
भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली हाेती. तेव्हा केंद्रचालक उपस्थित नव्हते. या प्रकरणी पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुणे विभागीय मंडळाकडून याची चाैकशी करण्यात येईल. तसेच या प्रकरणात शिक्षक, विद्यार्थी यांची चाैकशी करण्यात येणार आहे. दाेषी आढळलेल्या शिक्षकांच्या सेवापुस्तकांत नाेंद केली जाईल. नियमानुसार त्यांची वेतनवाढ थांबविणे आणि निलंबित करणे आदी गंभीर स्वरूपाच्या शिक्षाही देण्यात येणार असल्याचे गाेसावी म्हणाले.
केंद्रचालकांनी जबाबदारी टाळल्याचे उघड
विद्यार्थ्यांनी वैयक्तिकरीत्या काॅपी केली आहे. प्रत्यक्षात दाेन काॅपी केसेस झाल्या असून, इतर विद्यार्थ्यांनी साहित्य बाहेर फेकून दिले. माेठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा केंद्रात काॅपी साहित्य घेऊन गेले हाेते. याचा अर्थ केंद्रचालकासह उपकेंद्रचालक आणि पर्यवेक्षकांनी आपापली जबाबदारी याेग्य रीतीने पार पाडलेली नाही.
नियामक सभेच्या निर्णयानंतर गुणांबाबत निर्णय
प्रश्नपत्रिकेचे संपादन, प्रश्नांची निवड करणे अथवा प्रिंटिंग करताना चूक झालेली असू शकते. प्रिंटिंगमध्ये चूक झाली असेल, तर काेणत्याही अधिकाऱ्याला आम्ही जबाबदार धरू शकत नाही. मात्र, मंडळाच्या विश्वासार्हतेला तडा गेल्यामुळे प्रिंटरला दंड करू शकताे. संयुक्त नियामक सभेचा निर्णय आल्याशिवाय विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय घेता येणार नाही.
शिक्षकांच्या मागण्यांवर लवकरच ताेडगा...
शिक्षक संघटनांची शालेय शिक्षणमंत्री, प्रधान सचिवांसह झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. शिक्षकांच्या मागण्या मंडळाशी संबंधित नसून त्या धाेरणात्मक स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाकडून सूचना येणे अपेक्षित आहेत. राज्य मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत बहिष्कार मागे घ्यावा, अशी विनंती केली आहे. या प्रश्नांवर येत्या काही दिवसांत ताेडगा निघेल, असे गाेसावी म्हणाले.