Pune: १३ लाख ९३ हजार पुणेकरांना ओमायक्रॉनचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 10:25 AM2021-12-03T10:25:04+5:302021-12-03T10:25:52+5:30
प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसताना आता ओमायक्रॉन व्हेरिएंटने दहशत निर्माण केली आहे. कोरोनाच्या संसर्गाचा संभाव्य ...
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसताना आता ओमायक्रॉन व्हेरिएंटने दहशत निर्माण केली आहे. कोरोनाच्या संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता लसीकरणाला प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे. राज्य शासनाच्या निर्बंधांशिवाय स्थानिक प्रशासनानेही नियम कडक केले आहेत. लसीकरणाचे दोन डोस, मास्कचा वापर आदी नियम सर्वत्र अनिवार्य करण्यात आले असून, नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात १३ लाख ९३ हजार ५९० नागरिकांचा दुसरा डोस घेणे अद्याप बाकी आहे.
कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगभरात २३हून अधिक देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात अद्याप एकही रुग्ण सापडला नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा निर्बंध वाढवण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांमध्ये ५० टक्के आसनक्षमता तर खुल्या मैदानांमध्ये २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. मॉलमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना दोन डोस अनिवार्य करण्यात आले आहेत.
दुकानात आलेल्या ग्राहकाने मास्क घातलेला नसल्यास त्यास हजार रुपये आणि दुकानदाराला दहा हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय राज्य प्रशासनाने घेतला आहे. मात्र, या निर्णयास व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. प्रशासन एकीकडे नवे निर्बंध लागू करत असताना नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळणे, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आदी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शहरात आतापर्यंत झालेले लसीकरण :
वयोगट | पहिला डोस | दुसरा डोस |
---|---|---|
१८-४५ | २०,७६,५८१ | १२,२३,५४७ |
४५-६० | ६,०३,८४५ | ४,७४,८११ |
६० वर्षांवरील | ४,६८,९०८ | ३,९९,९७४ |
एकूण | ३३,१८,२४२ | २२,५३,३०० |
दररोज तीन-पाच हजार तपासण्या
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शहरातील दररोजच्या चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले आहेत. शहरात दररोज सरासरी ३ ते ५ हजार तपासण्या होत आहेत. दररोज ५० ते १०० रुग्ण कोरोनाबाधित असल्याने निदान होत आहे. शहरातील १८५-२०० लसीकरण केंद्रांवर दररोज प्रत्येकी अडीचशे लसी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.