बनावट सह्या घेऊन केले १३ लाखांचे कर्ज मंजूर; बँक आॅफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 02:30 PM2017-12-14T14:30:05+5:302017-12-14T14:31:50+5:30
जामीनदाराची खात्री न करता बनावट सह्या घेऊन १३ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केल्याबद्दल विश्रामबाग पोलिसांनी महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांसह एका व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे़
पुणे : जामीनदाराची खात्री न करता बनावट सह्या घेऊन १३ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केल्याबद्दल विश्रामबाग पोलिसांनी महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांसह एका व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे़
बँक आॅफ महाराष्ट्रच्या बाजीराव रोड शाखेचे तत्कालीन सहाय्यक महाव्यवस्थापक जे़ व्ही़ मुजुमदार, एस़ बी़ ब्रम्हे, सहाय्यक व्यवस्थापक बी़ जी़ जोशी, एस़ बी़ देशपांडे आणि व्यावसायिक रवी कुलकर्णी (रा़ संतनगर, पर्वती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़
याप्रकरणी भरत बाबुराव भुजबळ (वय ५१, रा़ नाविन्य सोसायटी, वारजे) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भुजबळ यांची युनिटेक ही कंपनी असून रवी कुलकर्णी यांची फ्युजन कंट्रोल ही फर्म असून त्यांचा ट्रेडिंगचा व्यवसाय आहे़ दोघेही मित्र असून रवी कुलकर्णी यांनी महाराष्ट्र बँकेच्या बाजीराव रोड शाखेतून साडेतीन लाख रुपयांचे सीसी लोन घेतले होते़ या कर्जाला भरत भुजबळ हे जामीनदार होते़ त्यानंतर ३० आॅक्टोंबर २०१० रोजी बँकेकडून भुजबळ यांना रवी कुलकर्णी यांचे १३ लाख रुपयांचे कर्ज थकले असून तुम्ही जामीनदार असल्याचे त्यात म्हटले होते़ यानंतर रवी कुलकर्णी यांनी त्यांना मी बँकेचे कर्ज फेडतो, तु काळजी करु नकोस असे आश्वासन दिले़ भुजबळ यांनी बँकेतून माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काहीही माहिती मिळू शकली नाही़ त्यानंतर ६ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांना डेब्ट ट्रिब्युनल लवादाची नोटीस आली़ त्यात रवी कुलकर्णी यांच्या कर्जास जामीनदार म्हणून तुमची तळेगाव ढमढेरे येथील वडिलोपार्जित व तुमच्या नावे असलेल्या इतर मालमत्तेचा कोणताही व्यवहार करु नये, असे म्हटले आहे़ भुजबळ यांनी लवादातून कागदपत्रे मागविली असता ते एका कर्ज प्रकरणात जामीन असताना तीन वेगवेगळ्या कर्ज प्रकरणात जामीनदार म्हणून त्यांच्या बनावट सह्या करण्यात आल्या होत्या़ रवी कुलकर्णी याने बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन विश्वासघात केला व बँकेच्या अधिकाऱ्यांनी जामीनदाराची खात्री न करता परस्पर कर्ज मंजूर केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे अधिक तपास करीत आहेत़