मोबाईलवर गेम खेळण्यास आईने नकार दिल्याने १३ वर्षाच्या मुलाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 12:45 PM2019-01-01T12:45:03+5:302019-01-01T12:45:24+5:30
अभ्यासाऐवजी मोबाईलवर खेळत बसल्याने आई रागविल्याचे निमित्त झाले आणि...
पुणे : अभ्यासाऐवजी मोबाईलवर खेळत बसल्याने आई रागविल्याचे निमित्त झाले आणि एका १३ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नववर्षाच्या पूर्व संध्येला हा प्रकार घडल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती़.
दर्शन मनिष भुतडा (वय १३, रा़ गणेशनगर, धनकवडी)असे या मुलाचे नाव आहे़. ही घटना धनकवडीत सोमवारी रात्री घडली़
याबाबत पोलिसांनी सांगितले की, भुतडा कुटुंब धनकवडीमधील गणेशनगर येथील एका सोसायटीत रहात असून दर्शनचे वडिल मनिष भुतडा हे एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतात. दर्शन भुतडा हा आठवीमध्ये शिकत होता. ३१ डिसेंबरला दर्शन घरीच होता. आईने त्याला अभ्यासाला बस असे सांगितले़ काही वेळाने त्यांनी पाहिले तर दर्शन हा अभ्यास न करता मोबाईल घेऊन बसला होता़. आईने त्याला मोबाईलवर गेम खेळू नको, अभ्यास कर असे खडसावले. तसा दर्शनने मोबाईल ठेवून दिला व तो उठून अभ्यासासाठी खोलीत निघून गेला़. बराच वेळ झाला तरी खोलीतून काही आवाज आला नाही़. हे लक्षात आल्यावर आईने खोलीत जाऊन पाहिले असता दर्शनने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. त्याला आईने इतरांच्या मदतीने तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, त्या अगोदरच त्याचा मृत्यु झाला होता.
सहकारनगरपोलिसांनी आकस्मात मृत्यु अशी नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.