चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी १३० कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 06:45 PM2019-02-19T18:45:59+5:302019-02-19T18:50:31+5:30
या पुलाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये केले आहे.
पुणे : शहरातील बहुचर्चित चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी दुस-या टप्प्यात तब्बल १३० कोटी रुपये ६९ लाख रुपयांचा मोबदला देण्यास स्थायी समितीने नुकतीच मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यात महापालिकेने ८६ कोटी रुपयांचे भूसंपादन केले आहे.
चांदणी चौकातील प्रस्तावित उडडाणपुलासाठी महापालिकेकडून सुमारे २८ हेक्टर भूसंपादन करण्यात आले आहे. त्यात सुमारे १३ हेक्टर खासगी जागा आहे. यात काही जागा बीडीपी तसेच विकास आराखड्यात आरक्षित आहे. पहिल्या टप्प्यात प्रशासनाकडून या भागात असलेल्या बांधीव इमारतींच्या मिळकतधारकांना सुमारे ८६ कोटींचा मोबदला देण्यात आला आहे. त्यानंतर आता दुस-या टप्प्यात १०.६० हेक्टरचे भूसंपादन करण्यात आले आहे. त्यात सुमारे ७९ जागामालकांचा समावेश आहे. यातील सुमारे ५.५७ हेक्टरच्या जागा मालकांना रोख स्वरूपात १३० कोटींचा निधी दिला जाणार आहे. तर उर्वरीत ५.४ हेक्टरच्या जागा मालकांना टीडीआर आणि एफएसआय च्या माध्यमातून मोबदला दिला जाणार आहे,अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळिक यांनी दिली.
या पुलाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये केले आहे. असे असतानाही तब्बल दीड वर्षांचा कालावधी गेला, तरी हे काम अजून सुरू झालेले नाही. या प्रकल्पासाठी राज्यसरकारने विशेष प्रकल्प म्हणून मान्यता देत १८५ कोटींचे अनुदान दिलेले असले तरी, प्रत्यक्षात या पूलाचे काम अजूनही सुरू झालेले नाही. या पुलासाठीची सुमारे ९६ टक्के जागा महापालिकेने संपादित केली आहे. मात्र, अजून त्यातील काही जागेची कागदपत्रे पालिकेकडे आलेली नाहीत. तसेच उर्वरित ४ टक्के जागा ताब्यात आल्याशिवाय, काम सुरू न करण्याची भूमिका हे काम करण्यात येणा-या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली आहे. त्यामुळे अवघ्या ४ टक्के जागेसाठी हे काम रखडले आहे.