पुणे जिल्ह्यातील १३६६ सोसायट्या होणार ऑनलाइन;जिल्हा उपनिबंधक यांचा शिरूर येथे आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 13:41 IST2024-12-21T13:41:35+5:302024-12-21T13:41:35+5:30

केंद्र शासनाच्या या ऑनलाइन प्रणालीसाठी नाबार्डकडून नियुक्त केलेल्या संस्थेकडून सर्व सचिवांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

1366 societies in Pune district will go online; District Deputy Registrar reviews in Shirur | पुणे जिल्ह्यातील १३६६ सोसायट्या होणार ऑनलाइन;जिल्हा उपनिबंधक यांचा शिरूर येथे आढावा

पुणे जिल्ह्यातील १३६६ सोसायट्या होणार ऑनलाइन;जिल्हा उपनिबंधक यांचा शिरूर येथे आढावा

शिरूर : जिल्ह्यातील सर्व १ हजार ३६६ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (सोसायट्या) सांगणीकृत करून त्या ऑनलाइन प्रणालीद्वारे जोडल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी दिली.

शिरूर येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात शिरूर तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांच्या ऑनलाइन प्रणालीचा आढावा घेण्यासाठी आयोजित सचिवांच्या बैठकीत ते बोलत होते.

जगताप यांनी सांगितले की, केंद्र शासनाने सहकार विभाग निर्माण केला आहे. या विभागाचे मंत्री अमित शहा यांनी गाव पातळीवर शेकऱ्यांना अल्प दरारत कर्जपुरवठा करणाऱ्या देशभरातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संपूर्ण सांगणीकृत करून त्या ऑनलाइन प्रणालीद्वारे एकत्र जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्व संस्थांना केंद्रीय सहकार विभाग व राज्याच्या सहकार विभागाने मिळून संगणक उपलब्ध करून दिले आहे. ही ऑनलाइन प्रणाली सुरू झाल्यानंतर प्रत्येक सहकारी संस्थेत होणारे कर्ज वाटप, शेअर्स कपात, व्याज कपात व दिवसभरातील वसूल असे प्रत्येक दिवासचे काम हे तालुका स्तरावर, जिल्हा, राज्य व देशपातळीवर संबंधित सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसणार आहे. तसेच, आगामी काळात संस्थाचे ऑडिटही ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणे अधिक सहज शक्य होणार आहे, तसेच सर्व संस्थांचा कारभार हा पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

ही प्रणाली देशपातळीवर पुढील आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजे मार्च २०२५ पूर्वी सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सहकारी संस्थांच्या सर्व सचिव, संचालक मंडळ व सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शिरूर तालुकासह निबंधक अरुण साकोरे, सहकार अधिकारी दीपक वराळ, जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी सचिन रणदिवे, वसुली अधिकारी नवनाथ फराटे, देखरेख संघ सहायक सचिव राजेंद्र पवार, जिल्हा बँकेचे विविध शाखांचे विकास अधिकारी व तालुक्यातील सर्व सचिव उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या या ऑनलाइन प्रणालीसाठी नाबार्डकडून नियुक्त केलेल्या संस्थेकडून सर्व सचिवांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिरूरच्या ११० संस्थांना सर्व सुविधा असणारे संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रशिक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे. - अरुण साकोरे, सह निबंधक

 

Web Title: 1366 societies in Pune district will go online; District Deputy Registrar reviews in Shirur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.