ताटातूट झालेल्या १३७ मुला-मुलींना केले पालकांच्या स्वाधीन; लोहमार्ग पोलिसांची कामगिरी
By नितीश गोवंडे | Published: August 4, 2023 04:39 PM2023-08-04T16:39:46+5:302023-08-04T16:40:18+5:30
पुणे जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या पुणे, दौड, अहमदनगर, कुर्डुवाडी, सोलापूर, मिरज रेल्वे स्थानकादरम्यान ही अल्पवयीन मुले आढळून आली
पुणे: लोहमार्ग पोलिसांनी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये तब्बल १९८ मुला-मुलींचा शोध घेतला. यावेळी ताटातूट झालेल्या ७५ मुले व ६२ मुलींना त्यांच्या पालकांच्या हवाली केले, तर उर्वरित ३९ मुले व २२ मुली अशा ६१ बालकांना सुरक्षेच्या दृष्टीने शासकीय सामाजिक संस्थेच्या स्वाधीन केले. याप्रमाणे एकूण १९८ बालकांना लोहमार्ग पोलिसांनी समाजकंटकांच्या दुष्ट हेतूपासून संरक्षण मिळवून दिले आहे.
पुणे जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या पुणे, दौड, अहमदनगर, कुर्डुवाडी, सोलापूर, मिरज रेल्वे स्थानकादरम्यान ही अल्पवयीन मुले आढळून आली. पोलिस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी रेल्वे पोलिस व रेल्वे प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण होण्याच्या दृष्टीने विनापालक बालकांना शोध घेण्याबाबत मार्गदर्शन केले आहे.
त्यानुसार पुणे लोहमार्ग पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या अल्पवयीन बालकांचा शोध घेऊन त्यांना विश्वासात घेतले जाते. त्यांच्याशी आपुलकीची भावना निर्माण करून त्यांना त्यांच्या पालकाच्या स्वाधीन केले जाते, तर काही बालकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शासकीय सामाजिक सन्थेच्या स्वाधीन केले जाते. रेल्वे स्थानकावरील पोलिस अधिकारी, अमलदार यांनी रेल्वे प्रशासन, सामाजिक संस्थेसोबत समन्वय ठेऊन विशेष मोहीम राबवून विनापालक असणाऱ्या मुलांचा शोध घेण्यात आला येतो.