राज्यात अवकाळीमुळे १३७९ कोटींचे नुकसान, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची अपेक्षा
By नितीन चौधरी | Published: December 29, 2023 11:19 AM2023-12-29T11:19:56+5:302023-12-29T11:20:25+5:30
राज्य आपत्ती निर्मूलन निधीतून ही भरपाई देण्यात येणार असून, याचा लाभ राज्यातील २३ लाख ९० हजार शेतकऱ्यांना होणार
पुणे: नोव्हेंबर अखेरीस झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील सुमारे १२ लाख ८७ हजार हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे १,३७९ कोटी रुपयांची भरपाईची मागणी केली आहे. राज्य आपत्ती निर्मूलन निधीतून ही भरपाई देण्यात येणार असून, याचा लाभ राज्यातील २३ लाख ९० हजार शेतकऱ्यांना होणार आहे. ही मदत लवकरात लवकर मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
सुमारे २४ लाख शेतकऱ्यांना फटका
अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यानंतर तब्बल दीड महिना उलटूनही राज्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे रखडले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर कृषी विभागाने तातडीने हा अहवाल पूर्ण करून राज्य सरकारला सादर केला. त्यानुसार राज्यातील १२ लाख ८७ हजार १८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या आपत्तीमुळे राज्यातील २३ लाख ९० हजार ५७१ शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कृषी विभागाने सादर केलेल्या या अहवालानुसार १३७९ कोटी ७७ लाख ७१ हजार रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
अकोल्यात सर्वाधिक नुकसान
अवकाळीचा सर्वाधिक फटका अकोला जिल्ह्याला बसला असून, येथील १ लाख ८८ हजार ४२७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्याखालोखाल अमरावती जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ६९६ हेक्टर तर बुलढाणा जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार १८१ क्षेत्र बाधित झाले आहे, तसेच सर्वाधिक २ लाख ९७ हजार ९७२ बाधित शेतकरी अमरावती जिल्ह्यातील आहेत. त्याखालोखाल बुलढाणा जिल्ह्यातील २ लाख ७६ हजार ५७५ तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २ लाख ६३ हजार ९६४ शेतकऱ्यांना या अवकाळीचा फटका बसला आहे. आर्थिक मदतीचा विचार करता सर्वाधिक २०८ कोटी ५८ लाख रुपयांची मदत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार असून, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०६ कोटी ३३ लाख रुपये नुकसानीपोटी मिळतील. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १३७ कोटी ७५ लाख रुपये मिळतील.
अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मदत लवकर जाहीर झाल्यास त्वरेने शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल. - दिलीप झेंडे, संचालक, विस्तार व प्रशिक्षण, पुणे