१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 07:31 AM2024-10-26T07:31:22+5:302024-10-26T07:31:48+5:30

काही दिवसांपूर्वी खेड-शिवापूर टोलनाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी ५ कोटींची रोकड जप्त केली होती

138 crore worth of gold captured; Action in Pune on special four-wheeler; Legal process begins | १३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू

१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: पुणे पोलिसांना निवडणूक नाकाबंदीदरम्यान सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १३८ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने ताब्यात घेतले. सोने वाहतुकीसाठी बनविलेल्या विशेष चारचाकी वाहनातून या दागिन्यांची वाहतूक केली जात होती. यासंदर्भात निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाला कळविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी खेड-शिवापूर टोलनाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी ५ कोटींची रोकड जप्त केली होती. त्यानंतर मावळमध्ये पावणेअठरा लाखांची रोकड जप्त केली. त्यानंतर शुक्रवारी हे सोन्याचे दागिने ताब्यात घेतले. संबंधित वाहन हे ट्रान्स्पोर्टचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. संबंधित कोट्यवधींचे सोने कुठून आले, कुणाचे आहे? याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

चार ठिकाणी तलवारी जप्त

धाराशिव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शस्त्रबंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीतही एकाच दिवशी चार ठिकाणी घातक तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात या तलवारी येताहेत कुठून, असा प्रश्न पडला आहे.

पनवेलजवळ कारवाई

पनवेल : पळस्पे चेक पोस्ट नाक्यावर पोलिसांनी कारमधून ६ लाखांची रोकड जप्त केली.

पोलिसांनी पकडलेल्या वाहनांत शहरातील अनेक सराफा संस्थांचे दागिने आहेत. अनेक दागिन्यांसोबत अधिकृत इन्व्हॉइसदेखील आहेत. याबाबत जीएसटी विभागाला पूर्ण माहिती असते. दररोज ही गाडी ये-जा करणारी आहे. ही सिक्युअर्ड लॉजिस्टिक्स सर्व्हिस आहे. याद्वारे दररोज रोख अथवा सोन्याची ने-आण केली जाते. पोलिस प्रशासनासह निवडणूक आयोग आणि आयकर विभागाने त्यांचे काम जरूर करावे; फक्त व्यापाऱ्यांना काही तसदी पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
- अमित मोडक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पु. ना. गाडगीळ ॲंड सन्स

हिंगोलीत १ कोटी ४० लाखांची रोकड पकडली

हिंगोली : शहरात वाहनांची तपासणी करताना शुक्रवारी दोन कारमध्ये एकूण १ कोटी ४० लाखांची रोकड आढळली. पोलिसांनी ही रोकड जप्त केली आहे. एका कारमध्ये १ कोटी २६ लाख ८८ हजार ५२० रुपये, तर दुसऱ्या कारमध्ये १३ लाख ५० हजार रुपये मिळाले. निवडणूक भरारी पथकही लगेच दाखल झाली. त्यांनी चालक अमित ओमप्रकाश हेडा (रा. हिंगोली) व गजानन माणिकराव काळे (रा. सोडेगाव) यांना विचारणा केली, मात्र त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.

शिरूरला अठरा लाखांची रोकड जप्त

पुणे जिल्ह्यातील शिरूर शहराजवळील सतरा कमान पुलाजवळ तपासणी नाक्यावर एका व्यक्तीकडून १८ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. तपासणी नाक्यावर पोलिस पाहताच अज्ञात कारमधून उतरून पळणाऱ्या संशयितास पोलिस पथकाने पाठलाग करून पकडले. हेमंत शर्मा (रा. कलीरामपाल मंडी, मथुरा), असे त्याचे नाव आहे.

Web Title: 138 crore worth of gold captured; Action in Pune on special four-wheeler; Legal process begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.