पुणे महापालिकेच्या शाळांना १३८ मुख्याध्यापक, २५ पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 09:29 PM2023-06-08T21:29:06+5:302023-06-08T21:29:20+5:30
शाळांना नवीन शैक्षणिक वर्षापासून मुख्याध्यापक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून तब्बल ५ वर्षांनंतर शिक्षकांची पदोन्नती
पुणे: पुणे महापालिकच्या १३८ शिक्षकांना मुख्याध्यापकपदी, तर पर्यवेक्षकपदी २५ जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांना नवीन शैक्षणिक वर्षापासून मुख्याध्यापक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल पाच वर्षांनंतर म्हणजे २०१८ नंतर शिक्षकांची पदोन्नती झाली आहे.
पुणे महापालिकेत एकूण ३४ गावे समाविष्ट झाली. त्यावेळी या गावातील शिक्षक पुणे महापालिकेत आले. त्यामुळे पुणे महापालिका आणि गावातून आलेल्या शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेचा प्रश्न निर्माण झाला. त्या विरोधात काही शिक्षक संघटना न्यायालयात गेल्या होत्या. त्यामुळे गेली पाच वर्षे सेवाज्येष्ठता यादी तयारच झाली नाही. अखेर सर्वाेच्च न्यायालयाने ज्या दिवसापासून शिक्षकांचा नोकरी सुरू केली तो दिवस सेवा ज्येष्ठतेसाठी ग्राह्य धरावा असा निकाल दिला. त्यानंतर पुणे महापालिकेच्या प्रशासन विभागाने शिक्षण विभागाच्या मदतीने शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी तयार केली. ही यादी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार तयार करण्यात आली. त्यामुळे समाविष्ट गावातून आलेल्या शिक्षकांचाही या यादीत समावेश झाला. या यादीला आयुक्त विक्रम कुमार यांनी मान्यता दिली.
पुणे महापालिकेच्या प्राथमिक विभागाच्या २८५ शाळापैकी १३८ शाळांना मुख्याध्यापक नव्हते. त्यामुळे शिक्षकाकडेच प्रभारी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात येत होता. त्यामुळे या शिक्षकांचा अध्यापनावर परिणाम होत होता. त्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मुख्याध्यापकांची नियुक्ती करणे गरजेचे होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने तातडीने ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.
२५ पर्यवेक्षक मिळणार
पुणे महापालिकेेच्या सात ते आठ शाळा आणि खासगी शाळांवर नियंत्रण ठेवण्याचे काम पर्यवेक्षकांचे असते. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे एकूण ३० पर्यवेक्षक पदाच्या जागा आहेत. गेली अनेक वर्षे पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे ५ पर्यवेक्षक होते. आता या पदोन्नतीमुळे आणखी २५ पर्यवेक्षक मिळणार आहेत.
''पुणे महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांना मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकपदी पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या पाच वर्षांनंतर ही पदोन्नती झाली आहे.- विक्रम कुमार, आयुक्त पुणे महापालिका''