Pune News: पुणे जिल्ह्यातील १३८ गावांना लवकरच मिळणार दिवसा वीज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 05:40 PM2023-09-30T17:40:58+5:302023-09-30T17:45:02+5:30

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात २२१ मेगावॅट सौर वीजनिर्मिती...

138 villages of Pune district will soon get daytime electricity | Pune News: पुणे जिल्ह्यातील १३८ गावांना लवकरच मिळणार दिवसा वीज

Pune News: पुणे जिल्ह्यातील १३८ गावांना लवकरच मिळणार दिवसा वीज

googlenewsNext

बारामती (पुणे) : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच साकार होत आहे. यातून पुणे जिल्ह्यात २२१ मेगावॅट सौर वीजनिर्मिती होणार आहे. जिल्ह्यातील ४१ उपकेंद्रांतर्गत सरकारी गायरान जमिनीवर हा प्रकल्प होणार आहे. बारामती मंडलातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर व शिरुर या ५ तालुक्यांतील जवळपास १३८ गावांमधील ६७ हजार शेतीपंप ग्राहकांना याचा फायदा होणार असून, त्यांना दिवसा वीज मिळणार असल्याची माहिती महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी दिली.

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महावितरणच्या माध्यमातून ‘ मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ युद्धपातळीवर राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ‘ एमएसईबी सोलार ॲग्रो पॉवर लि.’ ही कंपनी स्थापन केली आहे. पहिल्या टप्प्यात सरकारी पडीक गायरान जमिनीवर हा प्रकल्प साकारला जात आहे. यासाठी सोलार कंपनीने अकोला, बुलढाणा, वाशिम, नाशिक, अहमदनगर, पुणे, जालना, जळगाव व नांदेड या ९ जिल्ह्यांची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २२१ मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होईल. त्याकरिता जवळपास १ हजार ९१ एकर जागेची आवश्यकता असून, या जमिनी १ रुपया वार्षिक भाडेपोटी ३० वर्षांच्या करारावर शासनाकडून मिळाल्या आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे ही शासनाची भूमिका असल्याने गायरान जमिनी हस्तांतरण करण्याकामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणला मोलाची साथ दिली आहे. तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनीही जमीन हस्तांतरणास मदत केली आहे.

४१ पैकी २३ उपकेंद्र बारामती अंतर्गत तर उर्वरित पुणे परिमंडलात येतात. १० उपकेंद्रांना त्यांच्या संपूर्ण क्षमतेइतक्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये बारामती मंडलात लोणी देवकर व बाभूळगाव उपकेंद्रांतर्गत अनुक्रमे २०.१६ व ९.३८ मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून, त्याकरिता अनुक्रमे १०० व ४५ एकर जमीन करारावर उपलब्ध झाली आहे. तर उर्वरित २१ उपकेंद्रांना ४४० एकर अशी मिळून तब्ब्ल ५८६ एकर जमीन महावितरणला मिळाली आहे.

Web Title: 138 villages of Pune district will soon get daytime electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.