सरकारी साहेबांचा घास मोठा; १४ क्लास टू अधिकारी ACB च्या सापळ्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 11:47 AM2022-01-10T11:47:44+5:302022-01-10T11:51:48+5:30
पुणे विभागात गेल्या वर्षभरात तब्बल १६५ सापळा कारवाया करण्यात आल्या...
पुणे : कोरोनाच्या संसर्गामुळे गेली दोन वर्षे संपूर्ण अर्थचक्र मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात तर संपूर्ण बंद होते, पण सरकारी अधिकारी, कर्मचारी यांचा हात मात्र कायमच शिवशिवत होता. हातावर वजन पडल्याशिवाय काम करायचे नाही, हा पण त्यांनी या महामारीच्या काळातही सोडला नाही. त्यातून पुणे विभागात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वाधिक सापळा कारवाया केल्या आहेत. पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ६९ सापळा कारवाया करण्यात आल्या. त्यात ४ क्लास वन अधिकारी तर तब्बल १४ क्लास टू अधिकारी सापळ्यात अडकले आहेत.
पुणे विभागात गेल्या वर्षभरात तब्बल १६५ सापळा कारवाया करण्यात आल्या. त्यात २३५ आरोपींना पकडण्यात आले, तर अपसंपदाच्या २ गुन्ह्यांत ५ आरोपी व अन्य भ्रष्टाचाराच्या एका गुन्ह्यात २ आरोपींना पकडण्यात आले. पुणे विभागात २०२० मध्ये १३९ सापळा कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यात १२५ आरोपींना पकडण्यात आले, तर अपसंपदाच्या एका गुन्ह्यात ४ आरोपी व अन्य भ्रष्टाचाराच्या २ गुन्ह्यांत ५ आरोपींना पकडण्यात आले होते.
गतवर्षीपेक्षा वाढली लाचखोरी
या वर्षी पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ६९ लाचखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी ४६ गुन्हे दाखल होते. पुणे जिल्ह्यात केलेली कारवाई ही राज्यात सर्वाधिक आहे. पुण्यापाठोपाठ सातारा २०, सांगली २७, सोलापूर २४ आणि कोल्हापूर २५ असे गुन्हे दाखल झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील विभागावर लाचखोरी
विभाग एकूण कारवाई आरोपी
महसूल २१ ३०
पोलीस १६ २२
महापालिका ७ १४
जिल्हा परिषद ५ ७
९ लाखांची लाचेची मागणी
तळेगाव दाभाडे येथील नगरपालिकचे मुख्याधिकारी श्याम पोशेट्टी आणि उद्यान पर्यवेक्षक विशाल मिंड यांना तक्रार यांची चार कामांची बिलांची रक्कम अदा करण्यासाठी ९ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली होती.