साडेसात लाखांच्या ऐवजाची पोलिसाच्या घरातून चोरी, जावई व मुलीविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 04:12 AM2018-04-30T04:12:53+5:302018-04-30T04:12:53+5:30
निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ७ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे : निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ७ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, त्यांची मुलगी आणि जावयाने ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी माधव देवकाते (वय ७८, रा. हडपसर) यांनी वानवडी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून संगीता सोनवणे आणि बबन सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. ते पत्नीसह चिंतामणीनगर, हांडेवाडी रोड परिसरात राहतात. त्यांच्या मुलीचा विवाह झाला आहे. गेल्यावर्षी मुलगी नवºयासह फिर्यादीच्या घरात काही काळासाठी राहावयास आली होती. दरम्यान, फिर्यादीची पत्नी आजारी पडल्यामुळे त्यांना १ जून ते ३ जुलै २०१७ या कालावधीमध्ये उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते. फिर्यार्दी हे पत्नीची देखभाल करण्यासाठी दवाखान्यात जात होते. त्यांच्या अनुपस्थितीत घरातील कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असे एकूण ७ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरी झाला. काही महिन्यांनी हा प्रकार लक्षात आल्यानंतर हा ऐवज मुलगी आणि जावयाने चोरी केला असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. फिर्यादी हे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना
दोन मुले असून तेही पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांची विवाहित मुलगी त्यांच्या घरी पतीसह राहावयास आली होती.