मासवडीच्या जेवणातून १४ जणांना विषबाधा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 08:00 PM2018-12-26T20:00:45+5:302018-12-26T20:05:14+5:30

मुलीला मासवड्या खूप आवडतात. ती गावाला आल्यामुळे घरातील माणसांसाठी व नातेवाईकांसाठी मासवड्यांचा बेत आखण्यात आला.

14 people have been poisoned by Masawadi dining | मासवडीच्या जेवणातून १४ जणांना विषबाधा 

मासवडीच्या जेवणातून १४ जणांना विषबाधा 

googlenewsNext
ठळक मुद्देउपचार सुरु : सर्वांची प्रकृती स्थिर बेसनपीठ,मासवडीचा नमुना , शेंगदाणे यांचे नमुने लॅबमध्ये तपासण्यासाठी पाठविले जाणार

मंचर : आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे मासवडीच्या जेवणातून १४ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विषबाधा झालेल्यांपैकी ९ जणांवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.मुलीने मासवडी पुणे येथे मैत्रिणींना डब्यातून नेल्या होत्या. त्या खाल्ल्यानंतर पुण्यातील ५ जणींना विषबाधा झाल्याने त्यांच्यावर पुणे येथे उपचार करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याची माहिती उपचार करणाºया डॉक्टरांनी दिली. 
जारकरवाडी(ता. आंबेगाव) गावातील भोजणेमळा येथे राहणारे संजय दत्तात्रय भोजणे यांची मुलगी पुणे येथे शिक्षण घेते. महर्षी कर्वे विद्यालयात ती १२ वी च्या वर्गात शिकते. मुलीला मासवड्या खूप आवडतात. ती गावाला आल्यामुळे घरातील माणसांसाठी व नातेवाईकांसाठी मासवड्यांचा बेत आखण्यात आला. मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून जेवणाला सुरुवात झाली. त्या दिवशी अंगारकी चतुर्थी असल्याने अनेकांनी चंद्रोदय झाल्यानंतर मासवड्या खावून उपवास सोडला. दरम्यान मुलीने मैत्रिणींसाठी डबा भरुन मासवड्या पुणे येथे नेल्या. मैत्रिणींनीही या मासवड्या खाल्ल्या.बुधवारी सकाळी मासवड्या खाल्लेल्यांना त्रास जाणवू लागला. थंडी, ताप, जुलाब, उलट्या, डोके गरगरु लागल्याने त्यांनी स्थानिक डॉक्टरकडे उपचारासाठी धाव घेतली. हा विषबाधेचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांना उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. 
मंचर उपजिल्हा रुग्णालयात रमेश पांडूरंग लबडे (वय-६०), नितीन रमेश लबडे (वय २२), विष्णु लक्ष्मण लबडे (वय-६७), सत्यभामा विष्णु लबडे (वय ६२), शंकर विष्णु लबडे (वय-३५), अर्चना रोहिदास लबडे (वय-२६), साक्षी संजय भोजणे (वय -१६), चैताली संजय भोजने (वय-१२) सर्व रा. जारकरवाडी यांच्यावर उपचार सुरु आहेत. संजय भोजणे यांना त्रास झाला होता मात्र सकाळच्या उपचारानंतर ते बरे झाले आहेत. त्यांची मुलगी व तिच्या मैत्रीणी यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. मुलगी घरी येण्यास निघाली असल्याची माहिती संजय भोजणे यांनी दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश गुडे व डॉ. सतिश धमणे यांनी विषबाधा झालेल्या रुग्णांवर उपचार केले. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही. प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉ. महेश गुडे यांनी दिली. दरम्यान मासवडी बनविण्यासाठी वापरलेले बेसनपीठ,तसेच मासवडीचा नमूूना , शेंगदाणे यांचे नमुने लॅबमध्ये तपासण्यासाठी पाठविले जाणार आहेत.त्याचा रिपोर्ट आल्यानंतर विषबाधेचे कारण समजु शकणार आहे. 

Web Title: 14 people have been poisoned by Masawadi dining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.