नीरा खोऱ्यांतील धरणांत गतवर्षीच्या तुलनेत १४ टक्के पाणीसाठा कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 08:55 AM2022-08-08T08:55:36+5:302022-08-08T09:00:01+5:30
मे व जूनच्या पहिल्या आठवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस...
नीरा : नीरा नदीच्या धरण साखळीमध्ये मे व जूनच्या पहिल्या आठवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने उसंत घेतली. त्यामुळे नीरा खोऱ्यातील धरणांत गतवर्षीपेक्षा आजच्या तारखेला सरासरी १४ टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यांतील खंडाळा, फलटण तसेच पुढे सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी असलेल्या नीरा नदीवरील धरण साखळीत सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे. नीरा-देवघर, भाटघर, वीर धरण या वर्षी जूनमध्ये पाऊस लवकर न पडल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. नीरा खोऱ्यातील धरणांत रविवारी (दि. ७) गतवर्षापेक्षा सरासरी १३.९१ टक्क्यांनी पाणीसाठा कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसत असल्याने याचा परिणाम रब्बी व उन्हाळी हंगामाच्या पिकांना द्यावयाच्या पाण्यावर होणार असल्याची चिंता शेतकऱ्यांना समोर आहे. तसेच यावर्षी नीरा डावा व उजवा कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांना उन्हाळी आवर्तन कमी मिळू शकते असे समजते.
खरिपाची पिके ही पावसाच्या पाण्यावर येत असतात. मात्र दीपावलीनंतर रब्बी व उन्हाळी पिकांसाठी धरण लाभक्षेत्रातील शेतकरी हे कालव्यांच्या आवर्तनाच्या वेळापत्रकांवर अवलंबून असतात. आवर्तन काळात उसाला पाणी द्यायचे की उन्हाळी पीक करायचे हे नियोजन धरणातील पाणीसाठ्यावरच ठरवले जाते. मागील वर्षी उन्हाळ्यात वळवाचे, जून, जुलै व ऑगस्टमध्ये दमदार तर नंतर परतीचा पाऊसही झाला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही नीरा डावा व उजवा कालव्याचे आवर्तन एकही दिवस बंद नव्हते.
रविवारी ७ ऑगस्ट अखेर नीरा खोऱ्यातील भाटघर धरणामध्ये १८,०५५ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ७५.७६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी २०,५४२ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ८६.३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. नीरा देवघर धरणात ८,२३७ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ६८.६४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ११,९१५ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. तर वीर धरणामध्ये ९,४६३ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. म्हणजेच ९६.०५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ९,८३५ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे नीरा खोऱ्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती गतवर्षापेक्षा (१३.९१ टक्के) आकडेवारीवरून चिंताजनक असल्याचे जाणवत आहे.