CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे १४ तासांत १४ कार्यक्रम! पुणेकरांना भाेपळाच; ठोस घोषणा नाही
By राजू इनामदार | Published: August 4, 2022 09:01 AM2022-08-04T09:01:29+5:302022-08-04T09:01:41+5:30
प्रचंड पोलीस बंदोबस्तात पार पडले १४ कार्यक्रम
पुणे : मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांचा मंगळवारचा पुणे दौरा शहर किंवा जिल्ह्यासाठी देखील काहीच फलदायी ठरला नाही. विभागीय आयुक्त कार्यालयात घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना थोडक्यात सांगा असे म्हणत घालवलेले दोन तास वगळता दिवसभराचे १४ कार्यक्रम त्यांनी अक्षरश: उरकलेच. जिल्ह्यातील फुरसुंगी, हडपसर, सासवड, जेजुरी देवस्थान येथील दौऱ्याचाही यात समावेश आहे. तिथेही त्यांनी थोडाच वेळ दिला. मुख्यमंत्र्यांचा सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रमांचा धडाका रात्री एक वाजता संपला. या चाैदा तासांत चाैदा कार्यक्रम झाले, मात्र ठोस घोषणाच झाली नसल्याने पुणेकरांना भाेपळा मिळाल्याचे चर्चा आहे.
या दाैऱ्यात मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी सकाळी ११ वाजता घेतलेली वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक हा एकमेव सरकारी कार्यक्रम वगळता अन्य सर्वच कार्यक्रम राजकीय किंवा धार्मिक, खासगी होते. यात सकाळी ११ ते रात्री ११:४५ असा मुख्यमंत्र्यांचा नियोजित कार्यक्रम होता. प्रत्यक्षात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून मुख्यमंत्री १२.४५ वाजता मुंबईकडे जाण्यासाठी रवाना झाले. यासाठी पोलीस आयुक्तांसह प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला. सकाळपासून ते थेट रात्री पाऊण वाजेपर्यंत पोलीस दल कार्यरत होते. या सर्व धावपळीतून शहराच्या पदरात काहीच पडले नाही.
असा झाला दाैरा
- मुख्यमंत्र्यांनी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली, त्यानंतरची पत्रकार परिषद त्यांनी पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नाला एका वाक्याची उत्तरे देत संपवली व काही मिनिटांतच ते निघूनही गेले.
- सासवडमध्ये सभा घेतली. हडपसरमध्ये त्यांच्याच नावाच्या एका उद्यानाचे लोकार्पण केले. त्यांच्या गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या धनकवडीतील निवासस्थानी भोजनही घेतले.
- दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आरतीसाठी ते रात्री १० वाजून १६ मिनिटांनी आले. तिथूनच पुढे दत्त मंदिरात गेले, मात्र आरतीची काही मिनिटे वगळता तिथेही ते थांबले नाहीत.
- पोलीस आयुक्त कार्यालयात रात्री ११.४५ वाजता शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक घेतली. या बैठकीतही मुख्यमंत्री काही मिनिटेच थांबले.
- सकाळच्या अधिकाऱ्यांची व रात्रीची गणेश मंडळाची अशा दोन्ही बैठकांमध्ये शहर किंवा जिल्ह्यासाठी एकही महत्त्वाचा निर्णय झाला नाही. गणेश मंडळाच्या बैठकीत मात्र अखेरचे सलग पाच दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकांची परवानगी असेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. याआधी ही परवानगी फक्त तीन दिवस होती.
पुण्याच्या प्रश्नांवर माैन
महापालिकांचा ३ चा प्रभाग ४ चा करण्याबाबत काय सुरू आहे यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत याबाबत काहीही निर्णय झालेला नाही, असे सांगितले. लगेचच बुधवारी सायंकाळी मुंबईत प्रभाग रचना पुन्हा ४ ची करण्याबाबत निर्णय झाला. जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेचा वाद, पुण्याच्या पिण्याच्या पाण्यावरून जलसंपदा विभागाकडून महापालिकेला दिला जात असलेला त्रास, छावणी मंडळांचे महापालिकेत होणारे संभाव्य विलीनीकरण अशा कोणत्याही प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे काहीही बोलले नाहीत.