बसमधील चोरीचे 14 गुन्हे उघडकीस : पैसे चोरणा-याला टोळीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 08:58 PM2019-08-22T20:58:41+5:302019-08-22T21:01:01+5:30
गेल्या काही दिवसांपासून बस मधून दागिने व पैसे चोरीला जाण्याचे अनेक गुन्हे घडले होते.
पुणे : बस मधून महिलांच्या गळयातील दागिने तसेच बँगेतून पैसे पळविणा-या चोरांना गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने अटक केली आहे. त्यातून बसमधील चोरीचे 14 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्या गुन्हयातून एकूण 4 लाख 36 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बस मधून दागिने व पैसे चोरीला जाण्याचे अनेक गुन्हे घडले होते. गुन्हयातील आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून मोठ्या संख्येने मुद्देमाल पोलिसांना मिळविण्यात यश आले आहे.
युनिट 2 ने केलेल्या तपासाविषयी पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. यात गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी गजानन पवार यांनी माहिती दिली. कृष्णा ऊर्फ आण्णा पोपटराव गव्हाणे (वय २४ वर्षे रा. केसनंद फाटा काळयाचा वाडा,वाघोली) आकाश ऊर्फ आक्या शिवाजी अहिवळे (वय २० वर्षे रा.धनकवडी) मंगेश ऊर्फ मंग्या सुरेश उकरंडे (वय १८ वर्षे रा. केसनंद गांव) सुरज किशोर सोनवणे (वय २१ वर्षे रा.खराडी) हुकुमसिंग राजसिंग भाटी ( वय ४७ वर्षे रा. खराडी) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुरज सोनावणे टोळीचा प्रमुख असून याच्यावर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडे तपास केला असता त्यांनी पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर अशा गर्दी असलेल्या बस स्टॉपकडे येणा-या बस मध्ये चढून गर्दीचा फायदा घेऊन जेष्ठ किंवा एकट्या महिला अथवा व्यक्तीला हेरुन त्यांच्या गळ्यातील दागिने, हातातील पाटल्या आणि पर्समधिल पैसे व दागिने चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली.
बंडगार्डन, स्वारगेट, शिवाजीनगर, वानवडी या पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या एकुण १४ गुन्ह्याची उकल गुन्हे शाखेने केली असुन त्यातून 4 लाख 6 हजार 600 रुपये किंमतीचे १०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ३० हजार रुपये रोख रक्कम असा एकुण ४.३६,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक नितिन शिंदे, पोलीस कर्मचारी संजय दळवी, यशवंत आंबे, अनिल ऊसुलकर, शेखर कोळी, दिने गडांकुश, अस्लम पठाण, विनायक जाधव, अतुल गायकवाड, चेतन गोरे, विशाल भिलारे, उत्तम तारु, विवेक जाध स्वप्निल कांबळे, कादीर शेख, अजित फरांदे, मितेश चोरमले व गोपाळ मदने यांनी केली.