या १४ गावातील घरांवर झळकतात मुलींच्या नेमप्लेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 08:17 PM2018-04-13T20:17:07+5:302018-04-13T20:33:05+5:30

‘लेक वाचवा, लेक शिकवा’ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी हा संदेश गावातील घराघरांमध्ये पोहोचवण्याचे काम या मुलींच्या नावाच्या पाट्यांमुळे झाल्याचे पाहावयास मिळत आहे.   

14 villages display there girls name on house nameplate | या १४ गावातील घरांवर झळकतात मुलींच्या नेमप्लेट 

या १४ गावातील घरांवर झळकतात मुलींच्या नेमप्लेट 

googlenewsNext
ठळक मुद्देस्त्री जन्माचे अनोखा उपक्रम राबवून स्वागत 

तळेगाव ढमढेरे : वंशवेल वाढण्याच्या हव्यासातून समाजात वंशाच्या दिव्यासाठी गर्भातच मुलीचा गळा घोटणारी माणसे समाजात पदोपदी दिसत असताना शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटात मात्र एक अभिनव उपक्रम हाती घेतला असून ‘लेकींचा सन्मान जपणारा’ गट अशी त्याची कीर्ती होत आहे. येथील १४ गावांतील एकूण ५ हजार ७८८ घरांच्या दरवाजांवर लेकींच्या नेमप्लेट (नावाच्या पाट्या) झळकल्या आहेत. 

या माध्यमातून घरोघरी स्त्रीजन्माचे स्वागत केले जात आहे. ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी हा संदेश गावातील घराघरांमध्ये पोहोचवण्याचे काम या मुलींच्या नावाच्या पाट्यांमुळे झाल्याचे पाहावयास मिळत आहे.  येथील जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. घरात सर्वांनाच वाचनाची आवड असल्याने मी ही वाचत असते. विशेषत: महिलांच्या संदर्भातील वाचन जास्त करीत असल्याने मला महिलांच्या सन्मानासाठी हा उपक्रम हाती घ्यावासा वाटल्याचे ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले.  

मुलगी लग्न झाल्यावर सासरी गेली व सणानिमित्त माहेरी आल्यानंतर आपल्या नावाची नेमप्लेट पाहण्यास मिळाल्यानंतर एक वेगळाच आनंद तिला व तिच्या कुटुंबीयांना मिळत आहे. गावा-गावांतील युवतींनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.  मुलींचा सन्मान करण्याच्या दृष्टीने संपूर्ण जिल्हा परिषद गटात मुलींच्या नावाच्या नेमप्लेट दरवाजांवर लावून समाजात स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी एक वेगळीच मोहीम हाती घ्यावी अशी अपेक्षाही बांदल यांनी व्यक्त केली.                                             

या गटातील दहिवडी २५२, भांबर्डे ५८४, डिंग्रजवाडी ३२०, तळेगाव ढमढेरे ४५०, करंजावणे ३५६, दरेकरवाडी ३३०, निमगाव म्हाळुंगी ५८५, पारोडी ४३०, रांजणगाव सांडस ३८०, टाकळी भीमा ४८२, विठ्ठलवाडी ४३३, उरळगाव ३८०, आलेगाव पागा ४५८, धानोरे ३४८ अशा ७८८ घरांच्या दरवाजांवर नेमप्लेट बसविण्यात आल्या आहेत. 

आज विविध क्षेत्रांत स्त्रियांचे एक पाऊल पुढे असल्याचे दिसून येते, म्हणून स्त्रीला घरातही चांगला सन्मान मिळण्यासाठी, ज्या घरात मुलगी आहे, अशा घराच्या दरवाजावर तिच्याच नावाची नेमप्लेट (नावाची पाटी) लावण्याचा शुभारंभ महिला दिनाच्या दिवशी विठ्ठलवाडी गावापासून करण्यात आला होता. या जिल्हा परिषद गटाचा आदर्श पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वच जिल्हा परिषद गटांनी घ्यावा -  रेखा बांदल, जिल्हा परिषद सदस्या 

Web Title: 14 villages display there girls name on house nameplate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.