Pune: खासगी जलतरण तलावात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; व्यवस्थापक व सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Published: April 17, 2024 04:39 PM2024-04-17T16:39:51+5:302024-04-17T16:40:14+5:30
ही घटना घडली त्यावेळी जीवनरक्षक नसल्याचा आरोप मृत मुलाच्या नातेवाईकांनी केला असून, पोलिसांनी व्यवस्थापकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
पुणे : खराडी भागातील खासगी जलतरण तलावात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. ही घटना घडली त्यावेळी जीवनरक्षक नसल्याचा आरोप मृत मुलाच्या नातेवाईकांनी केला असून, पोलिसांनी व्यवस्थापकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिक नदीम तांबोळी (१४, रा. वडगाव शेरी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी नदिम इस्माईल तांबोळी (४० रा. गणेशनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलिसांत तक्रार दिली आहे. यावरून खालसा जिममधील सुरक्षा रक्षक व व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चंदननगर भागातील संघर्ष चौकात खालसा जिम आहे. खालसा जिमच्या आवारात जलतरण तलाव आहे. मंगळवारी (ता. १६) दुपारी अतिक आणि त्याचे मित्र जलतरण तलावात पोहण्यास गेले होते. त्यावेळी दम लागल्याने अतिक जलतरण तलावात बुडाला. अतिक तलावात बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला. येथील काही तरुणांनी पाण्यात बुडालेल्या अतिकला बाहेर काढले. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मुलाच्या नातेवाईकांनी सांगितले की, अतिक नुकतेच पोहायला शिकला होता. तो त्याच्या मित्रांसोबत दुपारी पोहण्यास गेला होता. पोहायला गेल्यानंतर बुडून त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी तेथे कोणीही जीव रक्षक नव्हते. तसेच तेथील सीसीटीव्ही देखील बंद आहेत. तांबोळी कुटुंब हे सर्वसामान्य कुटुंब असून मागील बारा वर्षापासून वडगाव शेरीत राहत आहे. अतिकचे वडील चालक म्हणून काम करतात. अतिकला दोन लहान भावंडे आहेत. गरीब घरातील हाताशी आलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. अतिक तांबोळी इयत्ता आठवीमध्ये शिकत होता.