अॅमेनिटी स्पेसची १४८़ ३७ हेक्टर जागा महापालिकेच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:15 AM2021-08-19T04:15:29+5:302021-08-19T04:15:29+5:30
पुणे : बांधकाम नियमावलीतील तरतुदीनुसार मोठ्या ७३२ गृहप्रकल्पांमधील सुमारे १४८.३७ हेक्टर अॅमेनिटी स्पेस महापालिकेच्या ताब्यात आहे. या अॅमेनिटी स्पेसवर ...
पुणे : बांधकाम नियमावलीतील तरतुदीनुसार मोठ्या ७३२ गृहप्रकल्पांमधील सुमारे १४८.३७ हेक्टर अॅमेनिटी स्पेस महापालिकेच्या ताब्यात आहे. या अॅमेनिटी स्पेसवर मैदान, उद्यान, शाळा, हॉस्पिटल, दवाखाना, अग्निशमन केंद्र, पोलीस ठाणे अशी विविध प्रकारच्या १९ सार्वजनिक सुविधा निर्माण करणे बंधनकारक आहे.
महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये यापैकी १२९ हेक्टर क्षेत्र असलेल्या ५८५ अॅमेनिटी स्पेसवर वरील सुविधांसाठी आरक्षणही टाकण्यात आले आहे. तर १४७ अॅमेनिटी स्पेस अद्याप आरक्षण राहिल्या आहेत. यापैकी काही जागांवर महापालिका आयुक्तांच्या मान्यतेने विरंगुळा केंद्र, बगीचा, व्यायामशाळा असे सार्वजनिक उपक्रम महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आले आहेत. दरम्यान, पीएमआरडीएकडे वर्ग करण्यात आलेल्या अॅमेनिटी स्पेसही महापालिकेकडे वर्ग करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे सध्या सुरू आहे़
----------------
सध्या महापालिकेच्या ताब्यातील अमेनिटी स्पेस
* एकूण ताब्यातील अॅमेनिटी स्पेस : ७३२ (क्षेत्रफळ १४८.३७ हेक्टर)
* वापर निर्देशित केलेल्या अॅमेनिटी स्पेस (आरक्षित) : ५८५ (क्षेत्रफ ळ १२९.०६ हेक्टर )
* शिल्लक अॅमेनिटी स्पेस : १४७ (क्षेत्रफळ १९.३१ हेक्टर )
-----------------------
अॅमेनिटी स्पेस म्हणजे काय?
विकास नियंत्रण नियमावलीनुसार मान्य विकास आराखड्यात त्याच मिळकतीमध्ये आरक्षण असल्यास विकसकांना काही जागा उद्याने, क्रीडांगण, प्राथमिक किंवा माध्यमिक शाळा, खेळाचे मैदान, अग्निशमन केंद्र, पोलीस स्टेशन आदी एकोणीस सार्वजनिक सुविधा विकसित करण्यासाठी राखून ठेवावी लागते. या जागा महापालिका ताब्यात घेऊन विकसित करते त्यास अॅमेनिटी स्पेस (सुविधा क्षेत्र) असे संबोधले जाते.
-------------------------