१५ हजार डॉलर्सची पुरुष टेनिस स्पर्धा २१ मार्चपासून पुण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:11 AM2021-03-21T04:11:42+5:302021-03-21T04:11:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मागील आठवड्यात शहरात २५ हजार डॉलर पारितोषिक रकमेची महिला आयटीएफ टेनिस स्पर्धेचे यशस्वी आयोजन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मागील आठवड्यात शहरात २५ हजार डॉलर पारितोषिक रकमेची महिला आयटीएफ टेनिस स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले. त्यानंतर आता येत्या २१ ते २८ मार्चदरम्यान डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पुरुषांच्या केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप या १५ हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या मोसमात शहरात पार पडणाऱ्या आणि केपीआयटी टेक्नॉलॉजीज यांचे प्रायोजकत्व लाभलेल्या आणि एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या दोन आयटीएफ स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा आहे. केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे सहसंस्थापक आणि पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील यांच्या पुढाकारातून या स्पर्धांचे आयोजन होत आहे.
यासंबंधी पाटील म्हणाले की, महिला आयटीएफ टेनिस स्पर्धेच्या आयोजनाचे आणि वाढत्या कोविड महामारीच्या साथीचे आव्हान यशस्वीपणे स्वीकारल्यानंतर आता पुरुषांच्या आयटीएफ स्पर्धेचेही आव्हान आता आमच्यापुढे आहे. स्पर्धेतील सहभागी भारतीय टेनिसपटूंना बहुमोल एटीपी गुण मिळवून देणे हाच या स्पर्धेच्या आयोजनामागील हेतू आहे. एकूण ३८ भारतीय पुरुष टेनिसपटूंना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
चौकट
स्पर्धेतील आंतरराष्ट्रीय खेळाडू
या स्पर्धेत फ्रांस, आर्यलँड, ग्रेट ब्रिटन, अमेरिका स्वित्झर्लंड, स्वीडन, इटली, चेक प्रजासत्ताक, रोमानिया व हंगेरी या अकरा देशातील अव्वल खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. नुकत्याच लखनऊ व इंदोर येथे पार पडलेल्या स्पर्धेतील विजेता अमेरिकेचा झेन खान, अमेरिकेचा ऑलिव्हर क्रॉफर्ड (६०४), स्वीडनचा जोनाथन म्रीधा (५९०), इंग्लंडचा आयडेन मॅक्युक (५६८), आर्यलँडचा सिमोन कार (५४९) व फ्रान्सचा जोफ्री ब्लॅकान्यूक्स (२९४) यांचा समावेश आहे. मुख्य ड्रॉमध्ये सिद्धार्थ रावत (४७४), मनीष सुरेश कुमार (६७५), पुण्याचा अर्जुन कढे (६७७) व आर्यन गोविस (८६३) या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धेत एकेरीसाठी गंता साई कार्तिक रेड्डी, करणसिंग, ध्रुव सुनिश आणि अथर्व शर्मा यांना वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आली आहेत.
चौकट
अशी होणार स्पर्धा
स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने २१ व २२ मार्चला होणार असून मुख्य ड्रॉचे सामने २३ मार्चपासून होतील. पुरुष दुहेरीचा अंतिम सामना २७ मार्चला तर एकेरीची अंतिम लढत २८ मार्चला होईल.